राऊंड द विकेट : यावेळी जिंकणार?

राऊंड द विकेट :  यावेळी जिंकणार?

डॉ.अरुण स्वादी

कसोटी मालिका Test Match Series तोंडावर आली असताना, अजूनही विराट कोहली आणि सौरव गांगुली Virat Kohli and Sourav Ganguly यांच्यातला कलगीतुरा संपायचे चिन्ह दिसत नाही. दौर्‍यावर जाताना विराट काडी टाकून आग लावून गेला. आमच्या बोर्डाने सूज्ञपणे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे टाळले, पण गांगुली साहेबांना विराटने आरोप करून खोटे ठरवल्याचा राग अनावर झाला असावा. त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत हे मधून-मधून ते विराटबद्दल जी काही विधाने करीत आहेत; त्यामुळे चांगले जाणवते आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या South Africa tour पार्श्वभूमीवर हे काही सुचिन्ह म्हणता येणार नाही.

एक तर आजवर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या देशात अजूनही मालिका जिंकलेली नाही. इंग्लंड व ऑस्ट्रेलियात विजय मिळवल्याने एका अर्थाने ही मालिका आपल्याला जिंकण्यासाठी फायनल फ्रांटीयर ठरू शकते, पण खरंच आपली तशी तयारी आहे का ? मुख्य म्हणजे आपल्याकडे तेवढा फौजफाटा आहे का? आणि आपला प्रतिस्पर्धी संघ या घडीला किती बलवान आहे? याचा अंदाज आहे का?

नुकतीच पार पडलेली न्यूझीलंडविरुद्धची मालिका दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या दृष्टीने अगदी कुचकामी होती. आपण मुंबईत आपल्याला सोयीची चेंडू उसळणारी फिरकी खेळपट्टी बनवली आणि किवी फलंदाजांना घालीन लोटांगण करायला लावले. शिवाय नाणेफेक आपणच जिंकली. ठीक आहे. ती मालिका जिंकणे आवश्यक होते. कारण वर्ल्ड कपचा फियास्को लोकांनी विसरणे आवश्यक होते.

लोकसभेची निवडणूक हरल्यावर नगरपालिका जिंकणे किमान अस्तित्वासाठी आवश्यक होते तसे, पण त्यामुळे ना फलंदाजांची परीक्षा झाली ना गोलंदाजांची! त्यातही टिम सौदीने घाम फोडला होताच...! आमचे तेज गोलंदाज कानपूरला पार नापास झाले. मुंबईत मोहंमद सिराजने एक झकास चेंडू हलवणारा स्पेल टाकला आणि आपण काय करू शकतो हे सिद्ध केले. इशांत शर्मा कसोटी क्रिकेटसाठी मओव्हर एजफ झालाय हे त्याने सप्रमाण सिद्ध केले, पण निवड समितीला तसे वाटत नाही.

उमेश यादव रेसचा घोडा आहे की, टांग्याचा हेच कळत नाही. कर्णधारही ते कळू देत नाही. बुमराह आणि शमी यांनी बराच आराम केला आहे. त्यांना लगेच लय सापडेल? पहिला कसोटी सामना, पहिला डाव देवाला म्हणत आपण हरत असतो. हा भूतकाळ तितका जुना नाही. मात्र फॉर्मातली आमची तेज गोलंदाजी हे निश्चितपणे आपले प्रभावी अस्त्र आहे. त्याचा प्रभाव दिसण्याआधीच मालिकेचा निर्णय लागू नये.आणि आमच्या फलंदाजीचं काय? रोहित शर्मा या वर्षातला आपला सर्वोत्कृष्ट फलंदाज, पण तो जायबंदी झालाय. त्याच्या जागी आलेला पांचाल दक्षिण आफ्रिकेत महिन्यापासून खेळतोय, पण रबाडा, नॉरकेचा सामना त्याने कधी केलाय कोणास ठाऊक? कदाचित शिखर धवन उपयोगी पडला असता.

अजिंक्य रहाणेचा फॉर्म हरवलाय म्हणतायत, पण होता कधी? गेल्या तीन मोसमात तो नुसता धडपडतोय. चेतेश्वर पुजारा त्याची किंचित सुधारित आवृत्ती आहे एवढेच! असे हे ढपलेले दोन फलंदाज आमची मधली फळी सांभाळणार म्हणे! म्हणजे पुन्हा एकदा संघाला सावरायची जबाबदारी कर्णधार कोहलीच्या खांद्यावर. आता हा खांदाही थोडा थकल्यासारखा वाटतोय. इथे जड्डू भाईची आठवण येते. रवींद्र जडेजा भारताबाहेर तरी आपला प्रथम पसंतीचा अष्टपैलू खेळाडू आहे. भारतात अश्विन फलंदाज म्हणून खोर्‍याने धावा काढतो. परदेशात मात्र तो आडवं-तिडवं खेळून धावा जमवायची घाई करीत असतो. त्यानंतर आमचं शेपूट सुरू होतं. त्यामुळे जडेजा पाहिली पसंती ठरला असता.

आता तो नाही. मला वाटतं, अश्विनबरोबर शार्दूल ठाकूरला घेऊन भारत आपलं शेपूट बळकट करायचा प्रयत्न करेल. एक मात्र खरे, या शेपटाला आपण खूप नावं ठेवली आहेत, पण गेल्या काही दौर्‍यात त्यांच्या तडाख्यामुळेच आपण तरलो आहोत. दक्षिण आफ्रिका पाहुण्यांना फिरकी खेळपट्ट्यांच श्रीखंडाचं जेवण वाढणार नाही. उलट तिखट जाळ पिच बनवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तिथे तळाच्या फलंदाजांना आपले वजन टाकायलाच लागेल. कदाचित त्यांची कामगिरी मालिकेत कोण विजयी होणार ते ठरवेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ गेली दोन वर्षे भरकटलेला वाटत होता. डीविलीयर्स आणि आता दुप्लेसिसच्या अनुपस्थितीने त्यांची फलंदाजी कमकुवत वाटत होती, पण आता व्हॅन दुसान आणि मारक्रम छान खेळत आहेत. तरीही फलंदाजी हाच त्यांचा कच्चा दुवा आहे. तेज आक्रमण मात्र भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. रबाडा, नॉरकेबरोबर आता ओलॉव्हिएर परतला आहे. आमच्या खेळाडूंनी त्याला फारसे पाहिलेले नाही. थोडक्यात, ही मालिका भारतासाठी सोपी नाही. कर्णधार म्हणून जे जमलं नाही ते कोच म्हणून राहुल द्रविड करून दाखवतील?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com