राऊंड द विकेट : कसोटी क्रिकेटच भारी!

राऊंड द विकेट : कसोटी क्रिकेटच भारी!

डॉ. अरुण स्वादी

क्रिकेटमधले (Cricket ) तिन्ही प्रकारचे सामने एकाच दिवशी रंगतदार बनायचा विलक्षण योगायोग मंगळवारी 14 जूनला आला. ट्रेंटब्रिज इंग्लंडमध्ये ( England ) यजमान संघ विश्वविजेत्या न्यूझीलंडबरोबर पाच दिवसांचा कसोटी सामना खेळत होते. खेळ शेवटच्या दिवशी रोमांचक अवस्थेत पोहोचला होता. तिकडे लंकेचे वाघ कांगारू संघाबरोबर एकदिवसीय सामना खेळत होते. तिथे यजमान संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठे आव्हान उभे केले होते.

क्रिकेटमधला सर्वात लोकप्रिय फॉरमॅट म्हणजे टी-20 सामना! मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करो या मरो’ या वृत्तीने खेळत होता. सुरुवात चांगली करूनही शेवटी धावा आटल्याने भारत किंचीत दडपणाखाली आल्यासारखा वाटत होता. हे तीनही सामने मस्त रंगले. युजवेंद्र चाहलच्या लेगस्पिन गुगलीपुढे बवूमाच्या संघाची वाट लागली. लंकेत शनाकाच्या संघाने फिंचच्या संघाला चांगलेच कोंडीत पकडले होते, पण मॅड मॅक्स आला आणि त्याने लंकेच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. हरलेली मॅच जिंकून दिली. हा सामनाही अद्भूत म्हणायचा.

तिकडे दूर ट्रेंटब्रिजला खेळल्या जाणार्‍या सामन्याची कथा काही औरच होती. चार दिवस या कसोटीत कधी इंग्लंडचे तर कधी किवी संघाचे पारडे जड असायचे. चौथ्या दिवशी एका सत्रात न्यूझीलंडच्या मधल्या फळीने अवसानघातकी खेळ केला आणि इंग्लंडला उजेडाचा कवडसा दिसला. तरीही चौथ्या डावात आणि पाचव्या दिवशी 299 धावांचे आव्हान जरा जास्तच होते. इंग्लंडच्या दृष्टीने एक गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडणार होती ती म्हणजे जेमिसनशिवाय किवी गोलंदाजी करणार होते. ‘टी’ला सामना इंग्लंडच्या बाजूला झुकला होता असे काहींना वाटत होते, पण शेवटच्या सत्रात काहीही भलते-सलते होऊ शकते हे सर्वांना माहीत होते. झालेही तसेच...अगदी भलतेच! अविश्वसनीय... अतर्क्य...! जॉनी बेअरस्टो नक्की चहाच पिऊन आला होता ना, असे वाटावे इतका बेभान व अफलातून खेळायला लागला.

पूल आणि हूकचे त्याने मारलेले फटके तंबूतले प्रेक्षक झेल म्हणून पकडू लागले. पहिल्या चार-पाच षटकात जॉनीने सामना 180 डिग्रीने फिरवला. वादळी फलंदाजी करत निव्वळ 77 चेंडूत शतक ठोकून त्याने किवी गोलंदाजांना गुडघे टेकायला लावले. इंग्लंडने हा सामना अपेक्षेपेक्षा खूप लवकर संपवला. दुसर्‍या बाजूला कर्णधार स्टोक्स भक्कमपणे उभा होता. त्याचे पंचाहत्तर धावांचे योगदान मोठेच, पण जॉनीकी बातही कुछ और थी. त्याच्या खेळीला आपण बेअर शो म्हटले तर योग्य होईल. या कसोटीत 249 वेळा चेंडू सीमापार गेला. किवी संघाने 837 धाव काढल्या तरी ते हरले. पहिल्या डावात 553 धाव काढूनही इंग्लंडने 539 धावांचे प्रत्युत्तर दिल्याने दुसर्‍या डावात ते अडचणीत आले. एकूणच हा सामना म्हणजे चमत्कार होता. कसोटी क्रिकेट म्हणजे शंपेन क्रिकेट का आहे याचे प्रात्यक्षिक या सामन्याने दिले आहे. म्हणूनच 14 जूनला टी-20 आणि पन्नास षटकांचा सामना रंगतदार होऊनही कुरघोड केली ती रेड चेरीने खेळल्या जाणार्‍या कसोटी क्रिकेटनेच!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com