राऊंड द विकेट : कोंडी आणि सुटका

राऊंड द विकेट : कोंडी आणि सुटका

वेस्ट इंडिजची अवस्था 'बुडत्याचा पाय खोलात' म्हणावे तशी झाली आहे. पहिल्या सामन्यात ५५ धावांत खुर्दा उडाल्यावर जगज्जेत्यांकडून त्यांच्या दर्जाला साजेशा खेळाची अपेक्षा होती. त्यांनी सुरुवात छान केली, पण एविन लेवीस बाद झाल्यावर त्यांचे 'पहिले पाढे पंचावन्न' सुरू झाले...

निकोलस पूरन दोन झकास फटके मारून कृतकृत्य झाल्यासारखा लाँगऑफला झेल देऊन चालता झाला. फक्त भूतकाळावर जगता आले असते तर ख्रिस गेलच्या नावावर किमान ६० धावा तरी दिसल्या असत्या, पण आता 'युनिव्हर्सल बॉस' म्हातारा झालाय हे पदोपदी जाणवतेय. रसेलची अवस्था वेगळी नाही आणि ब्रावोदेखील थकलेला वाटतोय.

कायरॉन पोलार्डने फटकेबाजी केली खरी, पण त्याला आता वेसण घालण्यात बहुतेक संघांना यश येतेय. कुणी सांगेल, बरोबर बोलरच्या मागे सीमारेषेवर क्षेत्ररक्षक असतो; त्या पोझिशनला काय म्हणायचे? पोलार्ड सरळ छक्के मारताना तिथे बरोबर सापडतो. बिनबाद ७३ वरून १४३/८ ही मोठी घसरगुंडी होती.

त्यांनी सामना तिथेच गमावला होता, पण दक्षिण आफ्रिकेची अननुभवी फलंदाजी आणि डी कॉकची अनुपस्थिती यामुळे हे आव्हान त्यांना पेलेल का? असे वाटत होते, पण आयपीएल अनुभवाने हुशार झालेला मारक्रम व दुस्सेने सामना आरामात जिंकून दिला.

या सामन्यापूर्वी आणि नंतरही चर्चा होती ती मात्र क्विंटन डी कॉकच्या गुडघा टेकायला नकार देण्याची! असे करून डीकॉकने स्वतःच्या गुडघ्यावर पत्थर मारून घेतला आहे. दक्षिण आफ्रिका वर्णद्वेषी वागणुकीविरुद्ध किती आग्रही आहे हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या विरोधात उभे राहणे म्हणजे हाराकिरी आहे.

त्याला फारसा सपोर्ट संभवत नाही. त्याचा पवित्रा योग्य आहे का हा प्रश्न आहेच. अचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतून शांतपणे मार्ग काढत टेंबवा बवूमाच्या संघाने पहिला विजय आणि २ गुण मिळवून शर्यतीत धावायला का होईना सुरुवात केली आहे.

दरम्यान कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानने आसिफ अलीच्या छोट्या, पण आक्रमक खेळीने स्वतःची सुटका करून घेतली. फिनीशर कसा असतो हे सर्वांना पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने याची व्हिडिओ फिल्म पाहावी. नुसता भास मारत यायचे आणि बॅट गदेसारखी फिरवायची म्हणजे फिनिशर नोहे!

शोएब चाचानी आपल्या छोट्याशा, पण महत्त्वपूर्ण डावाने आसिफल साथ दिली आणि 'अभी तो मैं जवान हूं' हे दाखवून दिले. न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी मंद खेळपट्ट्यावर ते, विशेष म्हणजे त्यांचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडाला फेस आणू शकतात हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांचा सामना वाटतो तितका सोपा नव्हे!

- डॉ. अरुण स्वादी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com