राऊंड द विकेट : शो मॅन हरपला...!

राऊंड द विकेट  :  शो मॅन हरपला...!

डॉ. अरुण स्वादी ( Dr. Arun Swadi )

शाहीद आफ्रिदी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलला.दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्नला (Australian player Shane Warne ) तो लेग स्पिन गोलंदाजीचे विद्यापीठ ( University of Leg Spin Bowling ) म्हणाला.अगदी शंभर टक्के खरे आहे ते! लेग स्पिन गोलंदाजीचा इतिहास पहिला तर त्यात असंख्य महान खेळाडूंची जंत्री दिसेल. रिची बेनो, सुभाष गुप्ते, चंद्रशेखर, कादिर, कुंबळे असे काही अलौकिक खेळाडू पटकन आठवतील, पण शेन या सर्वांमध्ये खूप उजवा ठरावा. ब्रॅडमन फलंदाजात कसा सरस ठरतो तसा! त्यांचं कारणही सोप्पं आहे.मुळात त्याला गोलंदाजी करताना बघणं हाच आनंद होता.

तो किती यशस्वी होतो? विकेट किती घेतो? या बाबी निव्वळ तांत्रिक होत्या. त्याचा तो छोटा रनअप, ते ब्लॉन्ड लूक, ती आक्रमक नजर सारे काही दिलखेचक होते. त्याचं अपील दमदाटी असायची, पण अविर्भाव मात्र आर्जव करतोय, असा असायचा. नाबाद दिल्यावर तर तो असा बघायचा की वाटावं पंचांच्या या उद्दामपणाला मउपरवालाफ कधीच क्षमा करणार नाही. कोणी त्याला नाटकी म्हणतीलही, पण वॉर्नला मैदानावर गोलंदाजी (bowling ) करताना पाहणे हा स्वर्गीय आनंद होता.

शेनची अगदी अचानक एक्झिट झाली. तो जाईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. बावन्न हे काय जायचे वय आहे? अगदी परवा-परवापर्यंत तो खेळत होता ना समालोचन करत होता. कोणाला आवडो वा न आवडो; आपले मत परखडपणे मांडत होता. एक आहे त्याचं वजन थोडं वाढलं होतं. चेहर्‍यावर नाही म्हटलं तरी मद्याचा प्रभाव दिसायला लागला होता, पण हा असा अचानक हार्ट अटॅक यावा हे पटणारं नव्हतं. ठीक आहे तो प्रचंड सिगरेट ओढायचा. अगदी चेन स्मोकर असावा. कोणाशी नसेल, पण सिगरेटशी तो कायम एकनिष्ठ होता. त्याच्यावर मद्य आणि मदनिका यांचा जास्त प्रभाव होता. या बाबतीत तो क्रिकेटमधला मॅराडोना होता, पण असे बरेच जण असतात आणि आहेत. त्यांना काही झाले नाही, पण यमराज शेनला मात्र घेऊन गेला. सचिन म्हणतो तसं, मित्रा हे जायचं वय नव्हतं!

निव्वळ लेग स्पिनर म्हणून शेनचे मोठेपण निर्विवाद आहे. त्याच्याकडे भरपूर वळणारा लेग स्पिन होता. त्याचा चेंडू मेलबर्नहून सिडनीपर्यंत वळायचा. गुगली होता. फ्लिपर होता. चेंडूला उंची द्यायला त्याला आवडायचे. राउंड द विकेट रफमध्ये पिच करून तो फलंदाजाला बिहाइंड द बॅक त्रिफळाचित करायचा. त्याचा फ्लिपर जबरदस्त होता. या सर्वांचा तो मनमुराद वापर करायचा. रागावला की बाऊन्सर पण टाकायचा. मूलतः तो आक्रमक होता. हे त्याचे खरे वेगळेपण आणि मोठेपण.... भारतात त्याला खूप यश मिळाले नाही, पण दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशातले फलंदाज त्याला पाहिल्यावर नांगी टाकायचे.

पीटरसन एकमेव अपवाद! एरवी इंग्रजांवर असे राज्य कोणी केले नाही. गॅटिंगला पायामागून बाद करणारा तो चेंडू कोण विसरेल? कुलीनन तर त्याची रोजीरोटी होता. पाकिस्तान व लंकेचे फलंदाजही त्याला डोळ्याला डोळा भिडवून खेळू शकले नाहीत. अमित पागनिस, सिद्धू सचिन आणि लक्ष्मण यांनी त्याला भारतात स्थिरावू दिले नाही. म्हणून भारतात त्याला अतिशय माफक कामगिरी करता आली, पण लारा,सचिन, एंझमाम सारे टॉप फलंदाज त्याचे मोठेपण निर्विवादपणे मान्य करतात.

वॉर्न खरे तर फुल टाइम कर्णधार व्हायचा, पण त्याचा रंगेल स्वभाव, मनमानी वृत्ती, ड्रग, मैदानाबाहेरच्या भानगडी यामुळे त्याला या पदापासून वंचित राहावे लागले, पण त्याचे क्रिकेटचे ज्ञान अपार होते. रिची बेनो, आयन चॅपल यांचा तो भक्त होता. नवे शिकण्याची हौस होती आणि शिकवण्याची पण! राजस्थान रॉयलच्या पिल्लांना बरोबर घेऊन त्याने पहिली आयपीएल जिंकली होती.मी बेदी, चंद्रा प्रसन्ना पाहिले आहेत. कुंबळेही पाहिला आहे. बिल ओरिली आणि ग्रीमेंट नाही पाहिले. सुभाष गुप्ते खूप कमी पाहिला.

माझ्या मते शेन क्रिकेटमधला सर्वोत्तम स्पिनर ठरावा. मुरलीने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या हे खरेच, पण त्याची गोलंदाजीची शैली निर्विवाद नव्हती. त्यामुळे मवॉर्न परि या सम हाच...फ! शेनच्या अचानक जाण्याने तीन पिढ्यांचे नाते तुटले आहे. क्रिकेटमधला खरा वल्ली, खरा शोमन आपल्यातून निघून गेला आहे, पण त्याला विसरणे अवघड आहे. कारण हातात चेंडू घेऊन लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येक युवा खेळाडूपुढे आदर्श असेल तो शेन वॉर्नचाच....!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com