राउंड द विकेट : हातचलाखी करणारा गोलंदाज

राउंड द विकेट  : हातचलाखी करणारा गोलंदाज

डॉ. अरुण स्वादी ( Dr. Arun Swadi )

आजच्या क्रिकेटवेड्या ( Cricket ) पिढीने सोनी रामाधीनचे नाव ऐकले असेल असे वाटत नाही.त्यांना सुभाष गुप्ते देखील माहीत नसेल.अगदी चंद्रशेखर सुद्धा आठवत नसेल. पण यात त्यांचा काही दोष नाही. हा काळाचा महिमा आहे.हे विस्मरण मान्य केलंच पाहिजे. सध्या विचित्र गोलंदाजांचे पेव फुटलेे आहे.काहीतरी जादू करणार्‍या फिरकी गोलंदाजाना संघात स्थानही मिळते. लंकेकडे तर नेहमी अशा बॉलर्सची पर्वणी असते. अजंथा मेंडिस आठवतोय? सध्याचा अकिला धनंजयापण याच पठडीतला.

वेस्ट इंडीजचा ( West Indies ) सोनी रामाधीन या सर्वाचा मूळ पुरुष शोभावा. किमान पणजोबा तरी.तो फिरकी गोलंदाज होता. तो काय टाकायचा हे कायम गुपित राहिले आहे. तो ऑफ स्पिन टाकायचा असं काहीना वाटायचे.

काही त्याला लेग स्पिनर म्हणायचे. लोक तो काय टाकणार यावर पैज लावायचे. ऑफस्पिन किंवा लेग स्पिन असा आडाखा बांधल्यावर प्रत्यक्षात तो चेंडू सरळ जायचा. बरे त्याच्या अँक्शन वरून काही ओळखावे म्हटल तर तो फुल स्लिवचा शर्ट घालायचा व बटन लावायचा. त्यामुळे त्याने चेंडू कसा पकडला आहे हे कळायचे नाही. त्याचा हात लपवल्यासारखा पाठीकडून यायचा आणि शेवटच्या क्षणी दिसायचा.

बहुतेक तो मधल्या बोटाने चेंडू दोन्हीकडे वळवत असावा. त्याचा टप्पा अचूक होता. त्यामुळे खेळणे आणखी कठीण व्हायचे.इंग्लंडच्या संघाला या हातचलाखी करणार्‍या गोलंदाजाने पार रडवले होते.

आपल्या पहिल्याच दौर्‍यात वीस वर्षाचा असताना त्याने मोजून 26 विकेट घेतल्या आणि इंग्लिश फलंदाजांचे जिणे हराम केले.विंडीजने पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध त्यांच्या देशात मालिका जिंकली.अर्थात सोनी बरोबर व्हॅलेंटाईन नावाचा डावरा फिरकी गोलंदाज होता. या दोघांची मैदानावरची दोस्ती आयुष्याच्या अगदी शेवटापर्यंत टिकली.

रामाधीन भारतात माफकच यश मिळवू शकला. कदाचित त्याने चेंडूला जास्त फ्लाईट न दिल्याने असे झाले असावे. ऑस्ट्रेलियात मात्र सोनी अपयशी ठरला. तिथे नाव किती मोठं आहे यावर फलंदाजी केली जात नाही.

त्यामुळे त्यांनी, विशेषत: किथ मिलरने त्याला चोपले, पण तरीही 43 कसोटीत 158 विकेट ही कामगिरी उत्तम समजली जावी. मी रामाधीनला गोलंदाजी करताना पाहिले नाही, पण तो कदाचित सध्याच्या सुनील नरेनसारखा असावा.

नरेनला कसोटीत रस नाही, पण सोनीने मोजून 98 षटके एका कसोटीत टाकली. आजही तो विक्रम अबाधित आहे. त्याच्या या विक्रमासारखाच 92 वर्ष जगायचा विक्रम संस्मरणीय ठरावा. रामाधिनबरोबर इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणार्‍या वेस्ट इंडियन पिढीची अखेर झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com