राऊंड द विकेट : क्रिकेट जिंकले

राऊंड द विकेट : क्रिकेट  जिंकले

डॉ. अरुण स्वादी

टी-ट्वेंटी क्रिकेटके मुकाबलेमे टेस्ट क्रिकेट आणि वन डे क्रिकेट दोनो मे कुछ दम नही है, असे आजकाल म्हटले जाते. परंतु रावळपिंडी टेस्टमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने आणि भारताविरुद्ध गमावलेला एक दिवसीय सामना जिंकून बांगलादेशने रसिक मंडळींना आपली धारणा चुकीची तर नाही ना; यावर पुनर्विचार करायला लावला आहे.

रावळपिंडी कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लंडने पाचशेच्यावर धावा काढल्या तेव्हा रमीझ राजा या पाकिस्तानच्या चीफ सिलेक्टरने ही खेळपट्टी आहे की हायवे, असे काहीतरी उद्गार काढले होते, पण पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात, अगदी शेवटी-शेवटी, पाकिस्तानच्या शेवटच्या जोडीचा प्रतिकार मोडून इंग्लंडने दाखवून दिले की, या डांबरी रस्त्यावरसुद्धा धाडसी खेळ केला तर सामना जिंकला जाऊ शकतो. आणि तिकडे बांगलादेशमध्ये ढाक्क्याला, भारताच्या घशातला घास असलेला सामना बांगलादेशच्या शेवटच्या जोडीने झुंजार खेळ करीत, भारतीय क्षेत्ररक्षकांनी केलेली मेहरबानी खुले दिलसे स्वीकारत जिंकला आणि 50 षटकांच्या क्रिकेटमध्येसुद्धा रोमांचक खेळ केला जाऊ शकतो हे जगाला दाखवून दिले.

इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या कमालीचे क्रिकेट खेळतोय. शेवटच्या डावात पाटा विकेटवर भरपूर वेळ असूनही दिलेले 363 धावांचे आव्हान तसे थोडे विथ रिस्कच होते आणि पाचव्या दिवशी चहापानाच्या वेळेस हे आव्हान इंग्लंडच्या गळ्याशी येते की काय असे वाटू लागले होते, पण 40 वर्षाच्या अँडरसनने कमालीचा भेदक स्पेल टाकला. त्याला ऑली रॉबिन्सनची साथ होतीच. दोघांनी इंग्लंडला विजया समीप आणून सोडले. कसोटी सामन्यात शेवटच्या सत्रात काहीही चमत्कार घडू शकतो, असे नेहमी म्हटले जाते ते किती खरे आहे हे पुन्हा एकदा प्रत्ययास आले. शेवटच्या दिवशी चेंडू थोडासा स्विंग होत होता आणि खेळपट्टी वापरामुळे अगदी किंचित का होईना, पण उंच सखल झाली होती. हे खरे असले तरी पाकिस्तानच्या आठ विकेट घेणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पराभवाचा दोष बाबर आझमच्या संघाच्या माथी मारण्यापेक्षा इंग्लंडच्या गोलंदाजांनात्याचे श्रेय दिले तर ते योग्य ठरेल.

या कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये करतात तशी फटकेबाजी केली. पहिल्या दिवशी पाचशेच्यावर धावा फडकवून नवा विक्रम केला. लोकांनी खेळपट्टीला नाव ठेवले, पण इंग्रजांचे तितके कौतुक केले नाही. मला वाटते ही कसोटी निकाली ठरण्याची पायाभरणी इंग्लंडच्या सलामीवीरांनी म्हणजे क्रॉली आणि डकेतने केली. इंग्लंडचा नवा फलंदाज ब्रुक्स हा येणार्‍या दशकातला एक महान खेळाडू ठरू शकतो, असे माझे भाकीत आहे. या सर्वांनी मिळून इंग्लंडच्या पाकिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजीचा फडशा पडला. पाकिस्तानने पहिल्या डावात त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, पण शेवटच्या सत्रातल्या हाराकिरीमुळे बाबरचा संघ विजयी धावा काढू शकला नाही व पराभूत झाला. पुढच्या कसोटीत ते निश्चित फिरकी विकेट बनवणार आणि इंग्लंडला त्यावर नाचवायचा प्रयत्न करणार, पण दहा वर्षापूर्वीचे इंग्लिश फलंदाज आणि आजचे त्यांचे फलंदाज यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हे अस्त्र बुमरांग होऊ शकते.

इकडे ढाक्यात भारताला मोठा धक्का बसला. गचाळ क्षेत्ररक्षण हे आमच्या क्रिकेटचे आता अंग बनले आहे. दडपणाखाली त्यांची फिल्डिंग कोलमडून पडते हे पुन्हा पुन्हा दिसू लागले आहे. आमच्या स्लोग ओवरमधील गोलंदाजीबद्दल बोलायलाच नको. इतकी वाईट गोलंदाजी दुसर्‍या कुठल्या देशाची असेल का याची मला शंका येऊ लागली आहे. मोहम्मद सिराज सोडला तर एकाही गोलंदाजाला शेवटच्या प्रेशर कुकर ओवर्समध्ये प्रेशर क्रिकेट करता आले नाही. परिणामी अगदी सहजपणे जिंकत आणलेला सामना भारताने गमावला. हरण्यासाठी आमचा संघ सध्या वेगवेगळे प्रयोग करीत आहे की काय, असे आता वाटायला लागले आहे. काहीही असो, पण कसोटी आणि वनडेची रंगत पुन्हा पाहायला मिळाली हे समाधान काय कमी आहे?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com