
डॉ. अरुण स्वादी Dr. Arun Swadi
चला, आता बझबॉल क्रिकेट( Buzzball Cricket), कसोटी क्रिकेटच्या प्रांगणात दाखल झाला आहे. इंग्लंडने टी-20 स्टाईल क्रिकेट खेळून पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर 3-0 ने पराभूत करून एक वेगळाच इतिहास रचला. पाकिस्तानला पाकिस्तानात पराभूत करायचे म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात काढायचे असे पूर्वी म्हटले जायचे. ते बर्याच अर्थी खरे होते. एखाद दुसरी कसोटी जिंकणे वेगळे आणि मालिकेतील सगळेच कसोटी सामने जिंकणे वेगळे! यावेळी इंग्लंडने पहिल्यांदाच सपशेल पराभव करून, व्हाईट वॉश देऊन पाकिस्तानचे दात खेचून काढले आहेत. त्यांनी नुसती मालिका जिंकली नाही तर ते ज्या प्रकारे खेळले त्यापुढे पाकिस्तानचा थोडासुद्धा निभाव लागला नाही. फक्त पहिल्या कसोटीत शेवटच्या सत्रात पाकिस्तान सामना जिंकू शकेल, अशी काहीशी शक्यता निर्माण झाली होती. तेही इंग्लंडने खिलाडूवृत्तीने डाव घोषित केल्यामुळे. एरवी मालिका बर्यापैकी एकतर्फी झाली.
पूर्वीच्या काळात फिरकी खेळायचे म्हटले की इंग्लंडच्या पोटात गोळा यायचा. त्यांना पदलालित्य हा प्रकार माहीतच नव्हता. नुसते क्रिझमध्ये उभे राहून जागच्या जागी ते स्पिन खेळायचे. त्यामुळे स्पिनरविरुद्ध त्यांची भंबेरी उडायची. आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. सध्याचा इंग्लंड, विशेषतः त्यांचे फलंदाज वेस्ट इंडिजसारखे खेळतात. आली अंगावर तर घेतले शिंगावर म्हणत खेळतात. या पाकिस्तानच्या मालिकेत त्यांच्या फलंदाजांनी, विशेषतः बेन डकेत, हॅरी ब्रुक, ओली पोप या सर्वांनी अग्रेसिव्ह फलंदाजी केली. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील, पहिल्या दिवसापासून त्यांनी अशीच मारझोड फलंदाजी करायची रणनीती आखली आणि एखाद्या सत्राचा अपवाद सोडला तर त्यांनी अशीच तुफानी फलंदाजी करत गोलंदाजांना संधीच दिली नाही.
लिहून घ्या... हॅरी ब्रुक हा पुढच्या दशकातील नंबर वन फलंदाज ठरणार! त्याहून मोठी कमाल गोलंदाजांनी केली. पाकिस्तानच्या दगडी विकेटवर जलद गोलंदाजांचा कोणताही प्रभाव पडत नाही. त्या हृदयशून्य असतात. डेनिस लिलीसारख्या जागतिक कीर्तीच्या गोलंदाजानेसुद्धा पाकिस्तानच्या या खेळपट्ट्यांवर हात टेकले होते, पण अशा खेळपट्ट्यांवर ही मार्क वू डन सातत्याने उसळता मारा केला आणि पाकिस्तानी फलंदाजांना हादरवले. चाळीस वर्षांच्या जिमी अँडर्सनने इथे चेंडू चक्क स्विंग केले.
ओली रोबिन्सनने आपल्या उंचीचा फायदा घेत पाकच्या डावर्या फलंदाजांची परीक्षा घेतली. इंग्लिश जलद गोलंदाज ज्या पद्धतीने सहाय्य न करणार्या खेळपट्टीवर आग ओकत होते ते पाहिल्यावर अॅशेस सीरिजमध्ये आपले काय होणार? असे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना वाटू शकते. लीच त्यांचा रेग्युलर डावरा स्पिन गोलंदाज. त्याने आपली छाप पाडलीच, पण शेवटच्या कसोटीत अठरा वर्षांच्या कोवळ्या रेहान अहमदने आपल्या लेगस्पिनने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले.
जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा कर्णधार बेन स्टोक्स आपले रिव्हर्स स्विंग आणि उसळते चेंडू घेऊन फलंदाजांची जमलेली जोडी मोडण्यास सज्ज होताच. भारतीय उपखंडात इतकी सटीक गोलंदाजी खूप दिवसांनी पाहायला मिळाली. इंग्लंडचा संघ किती जोमात आणि जोशात आहे याची संपूर्ण कल्पना देणारा हा त्यांचा परफॉर्मन्स! उलट पाकिस्तान संघाची फलंदाजी तरी एक-दोन खेळाडूंवर अवलंबून असायची. कर्णधार बाबर आजम सातत्याने खेळला, पण तो बाद झाला की संघ पत्त्यासारखा कोसळायचा. गोलंदाजीतही तीच रडकथा. शाहीन आफ्रिदी नसल्यामुळे त्यांचा वेगवान मारा बोथट झाला होता. त्यात रौफला पण दुखापत झाली आणि मग नसीमही संघाबाहेर गेला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सुका दुष्काळ पडला. त्यांची लाज राखली ती त्यांच्या नवोदित लेग स्पिनर अब्रार अहमद या चस्मिस पोराने. त्याने मात्र कमाल केली.
इंग्लिश फलंदाजांना त्याने वेसण घातली. शेवटच्या डावात त्याला इंग्रजांनी बडवले, पण टारगेट मोठे असते तर आपण सामना जिंकून देऊ शकलो असतो हे त्याने सिद्ध केले. पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीत त्याच्याव्यतिरिक्त काही दम नव्हता. असे फार क्वचित होते. एकूणच पाकिस्तानला ही घरची मालिका बरीच जड गेली. आता कर्णधार बाबर आजमच्या नावाने लोक शंख करतील, पण त्यांनाही कळले आहे; आपल्याला इंग्लंडचा संघ लय भारी पडला. त्यांचे बझबॉल क्रिकेट जुन्या जमान्यातील वेस्ट इंडिजच्या कॅलिप्सो क्रिकेटची नवी आवृत्ती आहे.