राऊंड द विकेट : यजमान फॉर्मात

राऊंड द विकेट : यजमान फॉर्मात

शेवटच्या दहा षटकांत किंवा स्लॉग ओवर्समध्ये गचाळ गोलंदाजी (Bowling) करून प्रतिस्पर्धी संघाला सामना बहाल करायची एक विचित्र सवय आमच्या संघाला लागली होती, पण या विश्वचषक स्पर्धेत काहीतरी वेगळाच चमत्कार पाहायला मिळत आहे. शेवटच्या दहा षटकांत आम्ही सामना गरागरा फिरवत आहोत. समोरची टीम साडेतीनशे-चारशे धावांचा डोंगर उभा करील, असे वाटत असताना आपण विकेट घेत त्यांना छान रोखत आहोत. त्यामुळेच आजघडीला आपण एकही पराभव पत्करला नाही. उलट हातातून गेलेला सामना जिंकायची करामत केली आहे. हे घडतेय ते गोलंदाजांमुळे! फिरकी आणि तेज आक्रमणामुळे...!

न्यूझीलंड (New Zealand) सामन्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. १५९ धावांची मोठी भागीदारी झाल्यावर किवी ३००चा पल्ला हमखास गाठणार, असे वाटत होते, पण यावेळी धावांची उधळण करणाऱ्या कुलदीप यादवने प्रथम लॅथम आणि मग धोकादायक ग्लेन फिलिप्सला बाद केले. त्यानंतर फलंदाजांची रांग लागली. मोहम्मद शमीचा तिखट मारा त्याला कारणीभूत ठरला. फक्त दोन सीमर खेळवायचे असतील तर बुमराहबरोबर प्रथम शामीचा विचार झाला पाहिजे. मग सिराज येतो. किमान भारतात तरी त्याला पर्याय नाही. काल त्याने हे सप्रमाण सिद्ध केले. फिरकीसाठी कसे अष्टपैलू जडेजाबरोबर प्रथम पसंती कुलदीप यादव आहे? मग येतो अश्विनचा पर्याय!

भारताचे क्षेत्ररक्षण प्रथमच इतके ढिसाळ झाले. आम्ही किमान दोन झेल सोडले आणि मैदानी फिल्डींगसुद्धा मैदानाप्रमाणे दर्जेदार नव्हती. रोहित शर्माचा सध्या परपल पंच चालू आहे. गिलच्या साथीने तो डावाची सुरुवात अशी करून देतो की, आधी लढाई तो उसी वक्त जीत जाते है. त्याला गोलंदाज बाद करीत नाहीत. तो स्वतः कंटाळा आला म्हणून बाद होतो. विराट अशी विकेट फेकत नाही. तो जिद्दीने उभा राहतो. म्हणूनच त्याच्या नावावर एव्हढ्या धावा आणि शतके दिसतात. काल शेवटपर्यंत उभे राहून त्याने 'दर्यामे खसखस'सुद्धा होऊ न देता अलगद विजय मिळवून दिला.

पाचपैकी पाच सामने भारताने (India) जिंकले आहेत ते पाठलाग करून! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीच्या पडझडीमुळे त्यांचा कस लागला. त्यानंतर पावणे तीनशे धावा काढतानाही त्यांना फार कष्ट पडले नाहीत. हे दृश्य सुखद असले तरी पहिली फलंदाजी आणि थरारक लढत त्यांना खेळायला मिळाली तर तो अनुभव उपांत्य फेरीसाठी कामी येईल. आमचे घोडे तिथेच पेंड खाते.

- डॉ अरुण स्वादी

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com