राऊंड द विकेट : अकाली एक्झिट

राऊंड द विकेट : अकाली एक्झिट

ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स (andrew symonds) याचा एका कार अपघातात (Accident) बळी गेला ही अतिशय दुःखद बातमी कानावर पडली तेंव्हा पहिला विचार मनात आला बहुतेक खूप प्यायला असेल आणि गाडी कुठे तरी ठोकली असेल...

या त्याच्या वेळी-अवेळी पिण्यानेच तर त्याच्या सुंदर कारकीर्दीला दृष्ट लागली होती ना? नक्की काय झाले ते पुढे-मागे कळेलही पण सर्वांचा लाडका सायमंड्स तर गेलाच ना? ऑस्ट्रेलियन पब्लिकचा तो लाडका होता. पाँटिंग आणि क्लार्क या कर्णधारांना तो हवाहवासा वाटायचा, शिस्तीचा बडगा दाखवणारे ऑस्ट्रेलियन बोर्ड पण त्याच्या वागण्याकडे कानाडोळा करायचे.

याचे कारण एकच, त्याच्यात काहीतरी खास होते आणि सर्वांना तेच भावायचे.. इंग्लंडमध्ये जन्मलेला अँड्र्यू जर तिथेच खेळला असता तर त्याच्या नावावर शंभर कसोटी लागल्या असत्या. त्यावेळी इंग्लंडकडे दर्जेदार खेळाडू, विशेषतः व्हाईट बॉल क्रिकेटसाठी होते तरी किती? पण सायमंड्सने कांगारूंच्या देशात खेळायचा निर्णय घेतला.

त्यामुळेच त्याच्या नावावर जिंकलेले दोन विश्वचषक लागले. तो उत्तम बॅटिंग ऑल राऊंडर होता. बरेच काळ तो फिनिशर म्हणून वावरला. चौथा क्रमांक मिळाल्यावर त्याची फलंदाजी बहरली. तो आक्रमक फलंदाज होता. पण रिषभ पंतसारखा पहिलाच चेंडू मैदानाबाहेर फेकायचा आततायीपणा तो करायचा नाही. तो काळही तसा नव्हता. कडक ड्राईव्ह आणि ताकदीने मारलेले पुलचे फटके हे त्याचे सामर्थ्य होते.कसोटीत त्याला फिरकीने सतावले असेलही पण वन डेमध्ये त्याने स्पिनरना रडवले आहे.

2003 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध 83/4 अशा अवघड परिस्थितीत संघ असताना तो सुसाट सुटला आणि रन अ बॉलने त्याने 143 धावा कुटल्या.. त्यामुळे वसीम अक्रमच्या संघाचे ताबूत थंडे झाले. ही त्याची नावारूपाला आणणारी पहिली खेळी. उपांत्य सामन्यात 93 धावा करत त्याने लंकेची वाट लावली. या स्पर्धेत त्याची सरासरी शंभरच्या वर होती. त्यानंतर 2007 च्या विजयी संघातही तो होता.

वर्ल्डकपमध्ये 100 वर सरासरी असणारा तो एकमेव खेळाडू. बाकीच्या मालिकांमध्येही त्याची बॅट अशीच आग ओकत होती. त्याचमुळे त्यावर्षीच्या जागतिक संघात त्याला स्थान मिळाले. पुढे ऑल टाईम ग्रेट ऑस्ट्रेलियन वन डे संघातही त्याला निवडले गेले. कसोटीत मात्र त्याला बेताचेच यश मिळाले.अर्थात, तिथेही त्याने महत्त्वाची दोन शतके काढलीच. लंकेत स्पिनरनी त्याला जाम सतावले. कसोटीसाठी संघात चुरसही खूप होती. काहीही असो पण कुवत असूनही त्याचे यश मर्यादित राहिले. त्याचे निकनेम रॉय होते. तो मध्यम गती गोलंदाजी करायचा. विकेट काढायचा. जमलेल्या जोड्या फोडायचा.

वेळप्रसंगी ऑफ स्पिन पण टाकायचा आणि हातभर चेंडू वळवायचा. फिल्डर म्हणून तो दादा होता. एवढी भीमकाय शरीरयष्टी असूनही तो विलक्षण चपळ होता. त्याने अशक्यप्राय वाटणारे झेल घेतले आहेत व धावबाद केले आहेत. कव्हर्समध्ये तो पँथर होता म्हणा ना! सायमंड्स म्हटले की, हरभजन सिंग आणि मंकी गेटची आठवण येणारच.. खरे तर भज्जी त्याला मंकी म्हणाला यात मला तरी शंका नाही.

हा वंश विद्वेष होताच.. पण सचिनच्या स्पष्टीकरणाला ग्राह्य मानून भज्जीची तीन सामन्यांची शिक्षा टळली गेली असावी. खरे काय होते कोणास ठाऊक. याच सिडनी कसोटीत सायमंड्सने 163 धावा ठोकल्या होत्या. मला वाटते, इथेच त्याचा जोरदार किनारा लागलेला झेल पंचांनी नाकारला होता. पुढेही या दोघांचे वैर तसेच राहिले होते. पण मुंबईकडून ते एकत्र खेळायला लागले आणि दोस्त बनले.

नंतर मात्र सायमंड्सचे काय बिनसले कोणास ठाऊक. तो दारू प्यायला लागला. शिमगा करू लागला. एकदा त्याने फिशिंगला जाऊन टीम मीटिंगला दांडी मारली. मायकेल क्लार्क त्याचा जवळचा मित्र.. पण त्यालाही त्याने शिवीगाळ केली. शेवटी तर 2009 टी-20 विश्वचषक स्पर्धेतून त्याची हकालपट्टी करून त्याला परत पाठवण्यात आले. त्यांच्या मंडळाने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला.

पण पालथ्या घड्यावर पाणी पडायचे. अँड्र्यू म्हणायचा, मी बेवडा नाही. मी बिंज ड्रिंकर आहे. म्हणजे नक्की काय ते मला माहीत नाही. एका झटक्यात तो घटाघटा प्यायचा म्हणे. मग तमाशा आलाच. बारमध्ये भांडणे आलीच. या दारूने त्याचे पार वाटोळे केले. एरवी सायमंड्स त्याच्या देशाच्या किथ मिलर एवढा मोठा खेळाडू झाला असता. अँड्र्यू गाडी चालवत होता का? तो प्यायला होता का? हे सगळे प्रश्न आता व्यर्थ आहेत. सत्य हेच आहे की एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आपल्यातून अकाली आणि कायमचा निघून गेला आहे. इतकेच वाटते.... अँड्र्यू तू खूप लवकर एक्झिट घेतलीस रे.

- डॉ. अरुण स्वादी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com