
मुंबई | Mumbai
भारतात येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या (ICC Cricket World Cup 2023 ) पात्रता फेरीला आजपासून (दि. १८ जून) सुरुवात होणार आहे. हे सर्व सामने ५० षटकांचे असणार असून आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची पात्रता फेरी १० संघांमध्ये खेळवली जाणार आहे...
या स्पर्धेसाठी दोन गटांमध्ये ५-५ संघांची विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात झिम्बाब्वे, वेस्टइंडीज, हॉलंड, नेपाळ, अमेरिका या संघाचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटात श्रीलंका, आयर्लंड, स्कॉटलंड, ओमान आणि युएई संघाचा समावेश असणार आहे. यातील प्रत्येक संघाला गटातील प्रत्येक संघाशी १ सामना खेळायचा आहे.
तर प्रत्येक गटातील पहिल्या ३ संघांना सुपर सीक्समध्ये (Super Six) आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. सुपर सीक्समध्ये संघ अशा संघांशी भिडतील ज्यांच्याशी गट साखळीत त्यांचा सामना (Match) झालेला नाही. जे संघ सुपर सीक्स सामन्यांसाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या गटातून या टप्प्यात दाखल होणाऱ्या संघावर (Team) पहिल्या टप्प्यातील विजयाचे गुण दिले जातील.
तसेच अंतिम फेरीत दाखल होणारे दोन्ही संघ विश्वचषकाच्या मुख्य फेरीत आपले स्थान निश्चित करतील. स्पर्धेत एकूण ३४ सामने होणार असून हे सर्व सामने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब आणि बुलावायो येथील बुलावायो एथलेटिक क्लब आणि हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित करण्यात येणार आहेत.
याशिवाय ९ जुलै रोजी हरारे (Harare) येथे अंतिम सामना होणार असून ओल्ड हऱ्यारियन्स क्लबमध्ये सराव सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पहिला सामना झिम्बाब्वे विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार असून हा सामना हरारे येथे होईल.
तर सलामीचा सामना वेस्टइंडीजचा आणि अमेरिका यांच्यात आज (दि.१८ जून) रोजी खेळविला जाणार असून हा सामना ताकशिंगा क्लब येथे होणार आहे. पात्रता फेरीपूर्वी सराव सामने खेळवण्यात येणार असून सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि डिझनी प्लस हॉटस्टारवर करण्यात येणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक