
मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने रणजी सामन्यात आसाम विरोधात झालेल्या सामन्यात तिहेरी शतक ठोकले. पृथ्वी शॉने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दुहेरी शतक लगावत चर्चेत आला होता. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एक शतक ठोकत त्याने तिहेरी शतक पूर्ण केले आहे.
पृथ्वी शॉने त्रिशतक झळकावून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी (१० जानेवारी) शॉने १०७ चेंडूत शतक आणि २३५ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. त्याच्या या धडाकेबाज खेळीने मुंबईने पहिल्या डावात धावांचा डोंगर रचला आहे.
लंचब्रेकपर्यंत शॉ ३७९ धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या १३१ धावा झाल्या होत्या. यामुळे मुंबईचा पहिला डाव ३ विकेट्स गमावत ५९८ धावा असा मजबूत स्थितीत होता. शॉचा स्ट्राईक रेट ९८.९६ असून त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले.
लंचब्रेकनंतर शॉ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने उत्तम फलंदाजी केली. तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. पहिल्या स्थानावर बीबी निंबाळकर (BB Nimalkar) आहेत. त्यांनी १९४८-४९ च्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना काथियावारविरुद्ध नाबाद ४४३ धावा केल्या होत्या.