
मुंबई | Mumbai
पोर्तुगालचा सुपर स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळवता आले नाही. पण आता तो एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सौदी अरबमधील फुटबॉल क्लब अल नासरने रोनाल्डोला करारबद्ध केले आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोने नवीन क्लबसोबत २०२५ पर्यंत करार केला आहे. रोनाल्डोला वर्षाला २०० दशलक्ष युरोमध्ये करारबद्ध केले आहे. जर आपण भारतीय चलनात त्याचे मूल्य मोजले तर रोनाल्डोला एका वर्षात १७ अब्ज रुपये (१७७५०७१३२२४) पेक्षा जास्त मिळतील. म्हणजे १७०० कोटी रुपये, जे जगातील कोणत्याही खेळाडूचे सर्वात जास्त मानधन असेल.
अल नासरने अधिकृत घोषणा करताना एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये म्हंटल आहे की, ”हा एक असा करार आहे, जो केवळ आमच्या क्लबलाच नव्हे तर आमच्या देशाला, येणाऱ्या पिढ्यांना, मुले आणि मुलींना सर्वोत्तम बनण्यासाठी प्रेरित करेल. नवीन घरात रोनाल्डोचे स्वागत आहे.”
रोनाल्डोने २००९-१८ पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.