वनडे क्रमवारीत 'बाबर आझम' पहिल्या क्रमांकावर; विराटला टाकले मागे

वनडे क्रमवारीत 'बाबर आझम' पहिल्या क्रमांकावर; विराटला टाकले मागे

ICC ने एकदिवसीय अर्थात वन डे क्रमवारी जाहीर केली आहे

मुंबई | Mumbai

ICC ने एकदिवसीय अर्थात वन डे क्रमवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. ICC वनडे क्रमवारीत प्रथम स्थान गाठणारा पाकिस्तानचा बाबर आझम चौथा फलंदाज आहे.

पाकिस्तानने नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका २-१ ने जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आझमने ९४ धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे बाबर आझमच्या क्रमवारीत सुधारणा झाली.

बाबरकडे सध्या ८६५ गुण आहेत. विराटपेक्षा बाबर ८ गुणांनी पुढे आहे. तर, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने थेट चौथ्या नंबरवर मजल मारली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानसाठी २०१० व २०१२ सालचे १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक गाजवल्यानंतर बाबरचा समावेश २०१५ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात केला गेला. काहीदिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी त्याच्या नावे ८३७ गुण होते. पहिल्या सामन्यात शतक ठोकल्यानंतर तो अव्वलस्थानी गेला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात ३२ धावांची खेळी केल्याने त्याची घसरण झाली होती. परंतु, तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा दमदार खेळी करून त्याने पहिल्या स्थानावर अखेर कब्जा केला.

यापूर्वी, झहीर अब्बास (१९८३-१९८४), जावेद मियांदाद (१९८८-१९८९) व मोहम्मद युसुफ (२००३) हे पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या पहिल्या स्थानावर पोहोचले होते. अशा परिस्थितीत बाबर आझम हा आयसीसीच्या फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत प्रथम स्थान गाठणारा पाकिस्तानचा चौथा फलंदाज बनला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com