
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हा तलवारबाजी असोसिएशन ( District Fencing Association )आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन ( Maharashtra State Fencing Association) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभागाच्या मोलच्या सहकार्याने येथे आयोजित कॅडेट गटाच्या 19 वर्षे मुलांंच्या आणि मुलींच्या 17 व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी महाराष्ट्राच्या निखिल वाघने वैयक्तिक सॅबर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर मुलींच्या वैयक्तिक फॉईल प्रकारात मणिपूरच्या वैकहोम सोनिया देवीने चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या वैदेही लोहियाला 15-12 असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.
या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या वैदेही लोहियाने सुंदर सुरूवात करून 6-4 अशी दोन गुणांची आघाडी घेतली. परंतु त्यानंतर वैकहोम सोनिया देवीने सलग तीन गुण वसूल करून 7-6 अशी आघाडी घेतली. त्यानंतर चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेरच्या काही मिनिटात वैकहोम सोनियाने आक्रमक खेळ करून आपली आघाडी आणखी वाढवली.अखेर वैकहोम सोनिया देवीने हा सामना 15-12 असा जिंकून विजेतेपद मिळविले.
मुलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारात महाराष्ट्राच्या निखिल वाघने उपांत्य लढतीत एस. एस. ई. बी. च्या ऋषिकेशचा 15-09 असा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम लढतीतही निखिलने आक्रमक भूमिका घेत हरियाणाच्या सुरिन्दर कुमार लक्ष्य याच्या विरुद्ध पहिल्याच मिनिटात दोन गुण घेत चांगली सुरवात केली.तर नंतरही निखिलने आक्रमक खेळ करून ही लढत 15-10 अशी जिंकून सुवर्णपदक पटकावले. या दोन गटांमध्ये विजेत्या खेळाडूंना भारतीय हॉकी संघाचे कोच हिरासिंग यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या शर्वरी गोसावडेकडून अपेक्षा - मुलींच्या वैयक्तिक सॅबर प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या शर्वरी गोसवडेने सुंदर खेळ करून उपांत्य फेरी गाठली आहे. तिच्याकडून आणखी एक सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
दरम्यान, आज सकाळच्या सत्रात उपउपांत्य आणि उपांत्य सामने खेळविले जातील तर सायंकाळी अंतिम सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या सायंकाळी पाच वाजता प्रमुख पाहुणे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी सचिव तथा भारतीय तलवारबाजी महासंचाचे सचिव राजीव मेहता, नाशिकचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले, अखिल भारतीय मराठा महासंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राज्य सचिव नानासाहेब महाले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, मराठा महासंचाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष शेष नारायण लोढे, विलास वाघ, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
निकाल
मुले वैयक्तिक सॅबर अंतिम
1) निखिल वाघ(महाराष्ट्र) सुवर्णपदक 2) सुरिदर कुमार काशया ( हरयाणा) रजत पदक 3) श्रेयश जाधव (महाराष्ट्र) आणि ऋषिकेश ( एस. एस. ई. बी.) संयुक्त कांस्य पदक.
मुली वैयक्तिक फॉईल अंतिम
1) वैकहोम सोनिया देवी ( मणीपुर) - सुवर्णपदक 2) वैदेही लोहिया (महाराष्ट्) - रजत पदक 3) पाठक आर्या(चंदीगड) आणि जेनीषा एन. व्ही. (तामिळनाडू) संयुक्त कांस्य पदक.
मुली सॅबर उपांत्य फेरीचे सामने
1) लाईश्रम याबी देवी ( मणीपुर) _ विरुद्ध प्रग्या ( हरियाणा) 2) शरवारी गोसवडे (महाराष्ट्र) विरुद्ध नेगी हिमाशी (हरियाणा)