
नवी दिल्ली | New Delhi
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील (19th Asian Games) अकराव्या दिवशी भारतीय भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी करत पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra) यावेळी भारताच्याच किशोर कुमार जेना (Kishore Kumar Jena) सुवर्णपदकासाठी कडवे आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले. यात नीरज चोप्राने सुवर्णपदक तर किशोर कुमार जेना याने रौप्यपदक (Silver Medal) पटकावले आहे. भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे...
भारताचा भालाफेकपटू (Javelin Throwers) नीरज चोप्राने आपली सुरूवात जवळपास ८७ मीटर लांब भालाफेक करत केली होती. मात्र पंचांनी तांत्रिक कारण देत ही फेकी वैध मानली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा भालाफेक करावी लागली. त्याने पहिल्या प्रयत्नात ८२.३८ तर दुसऱ्या प्रयत्न ८४.४९ मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले होते. तर किशोर कुमार जेना याने पहिल्या प्रयत्नात ८२.३८ आणि दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८६.७७ मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले होते.
दरम्यान, यानंतर नीरजने आपल्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर भालाफेक करत आपले अव्वलस्थान आणि सुवर्णपदकाची (Gold medal) दावेदारी पुन्हा मिळवली. त्यानंतर किशोर कुमार जेना याने पुन्हा एकदा कमाल करत काही मिनिटांपूर्वी आपल्या केलेला वैयक्तिक सर्वोत्तम फेकीचा विक्रम मोडत चौथ्या प्रयत्नात ८७. ५४ मीटर भाला फेकला. तसेच पाचव्या फेकीत जेना याने फाऊल केला तर नीरजने ८०.८० मीटर भाला फेकला. तर सहाव्या फेकीत देखील जेनाचा फाऊल झाला आणि नीरजच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले. नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे.