नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

राष्ट्रीय व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे दि.13 व 14 मार्च रोजी राष्ट्रीय डायरेक्ट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 18 राज्यांमधील संघ सहभागी होणार असल्याची माहिती असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खा.डॉ.गावित म्हणाल्या, नंदुरबार येथील डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नंदुरबार येथे घेण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सदर स्पर्धांचे दि.13 मार्च रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. दि.14 रोजी समारोप व पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये 18 राज्यातील 20 पुरुष संघ तर 8 महिला संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये सुमारे 350 खेळाडू सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नियोजनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, तेलंगणा, पॉँडेचेरी आदी राज्यातील संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, 30 ते 35 पंच जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे खा.डॉ.गावित यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विक्रमसिंग, राज्याध्यक्ष प्रा.डी.बी.साळुंखे, प्रदेश सरचिटणीस प्राचार्य दीपक मोकलकर, राज्य संघटक शरद कदम टेक्निकल कमिटीचे सचिन पाटील आदी उपस्थित होते.