MI vs KKR : कोलकाता मुंबईविरूद्ध पराभवाची मालिका खंडित करणार?

MI vs KKR : कोलकाता मुंबईविरूद्ध पराभवाची मालिका खंडित करणार?

अबू धाबी | Abu Dhabi

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज गुरुवारी अबूधाबीच्या शेख झायद मैदानावर (Sheikh Zayed Stadium) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघामध्ये रोमांचक सामना होणार आहे...

मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात अनेक गुणवान आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दोन्ही संघाचे पाठीराखे खूप आतुरतेने वाट पाहत असतात.

दरवर्षी दोन्ही संघातील सर्व सामने अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक होतात. दोन्ही संघ आतापर्यंत एकूण २८ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात मुंबई संघाचे पारडे जड राहिले आहे.

मुंबईने आतापर्यंत २२ सामन्यात बाजी मारली आहे. तर कोलकात्याने ६ सामन्यात विजय नोंदवला आहे. मात्र कोलकाता संघाच्या चाहत्यांच्या मनात अजून एक प्रश्न जोर धरून आहे की, बलाढ्य मुंबईविरुद्ध पराभवाची मालिका कधी खंडित होणार? आजवर कोलकाता संघाने अनेक कर्णधार बदलले.

मात्र मुंबईवर (Mumbai) पूर्णपणे वर्चस्व गाजवण्यात सर्व कर्णधार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ऑईन मॉर्गनचा (Eoin Morgan) कोलकाता संघ (Kolkata) मुंबईला नमवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यंदाच्या विवो आयपीएल स्पर्धेत कोलकाता संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. ८ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ५ पराभवांसह ६ गुणांनी सहाव्या स्थानावर आहे. मुंबईला रोखून आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी कोलकाता उत्सुक आहे.

बंगळुरविरुद्ध झालेल्या आयपीएल १४ च्या उत्तरार्धात झालेल्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे कोलकाता संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. गत सामन्यात बंगळुरविरुद्ध कोलकाता संघाच्या लौकी फेर्ग्युसन आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे कोलकाता संघाच्या गोलंदाजांनी बंगळूर संघाला ९२ धावांवर रोखले होते.

तर दुसरीकडे चेन्नईविरुद्ध मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईला २० षटकात १५७ धावांवर रोखले होते. मात्र सौरभ तिवारी वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नव्हती.

शिवाय नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) अनुपस्थितीत मुंबईचा पराभव टळू शकला नव्हता. आता गुरूवारच्या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या खेळणार का ? याचा निर्णय नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट होईल.

मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्रिस लीन, सौरभ तिवारी, ईशान किशन, अनमोलप्रीतसिंग यांच्यावर आहे . अष्टपैलूंमध्ये किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, जेम्स निशाम, मार्को जेन्सन आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, जयंत याद, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने, नेथन कुल्तेरनैल, पियुष चावला आहेत.

कोलकाता संघाच्या फलंदाजीची मदार दिनेश कार्तिक, ऑईन मॉर्गन, करुण नायर, राहुल त्रिपाठी, शुभमन गील, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, टीम सॅफरीट, रिंकूसिंग यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये बेन कटिंग, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पवन नेगी आहेत. गोलंदाजीत टीम साऊथी, लोकि फेर्ग्युसन, संदीप वॉरियर, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, हरभजनसिंग, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com