मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान
IPL

मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान

नवी दिल्ली | Delhi

आयपीएल २०२१ मध्ये गुरुवारी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे.

मुंबई इंडियन्स सध्या ४ गुणांसह सरस धावगतीच्या बळावर चौथ्या तर राजस्थान रॉयल्स ४ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मुंबई आणि राजस्थान संघासाठी हा सामना स्पर्धेतील आपला पुढील प्रवास कायम राखण्याच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे .

विजेता संघ स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखणार आहे. तर पराभूत संघाची वाट अधिक बिकट होणार आहे. राजस्थान आणि मुंबई आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २३ वेळा एकमेकांसमोर आले असून, यात दोन्ही संघांनी ११ विजय संपादन केले आहेत. तर एक सामना अनिकली राहिला आहे .

गतवर्षी दुबईत झालेल्या हंगामात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय संपादन केला होता. अखेरच्या सामान्यत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यातील विजयाने राजस्थान संघाचे हौसले बुलंद असून, आता कोलकात्यानंतर मुंबईवर मात करण्यासाठी राजस्थान सज्ज आहे.

तर दुसरीकडे पंजाब आणि दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवातून सावरून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी मुंबई सज्ज आहे.

राजस्थान संघासाठी जमेची बाजू म्हणजे पहिल्या सामन्यात पंजाबकिंग्ज विरुद्ध शानदार शतक झळकावणारा संजू सॅमसन पुन्हा एकदा लयीत परतला आहे.

ही चांगली बाब आहे. मात्र जोस बटलर , यशस्वी जयस्वाल यांच्याकडून पावरप्ले मध्ये चांगली सुरुवात संघाला अपेक्षित आहे. शिवम दुबे आणि डेविड मिलर फलंदाजीत आपलं योगदान देत आहेत.

मात्र रियन परागला अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी आलेली नाही. त्याच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. क्रिस मॉरीस अखेरच्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध ४ निर्णायक फलंदाजांना बाद करून संघाच्या विजयात निर्णयक भूमिका बजावली होती.

मुंबई संघाबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

रोहित शर्माचा साथीदार क्विंटन डिकॉक, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या अद्याप चांगली फलंदाजी करू शकलेले नाहीत. त्यांना आपली फलंदाजी सुधारण्याची संधी आहे. मधल्या फळीतील फलंदाजांचं अपयश यामुळे कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढली आहे. शिवाय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे आणि इतर गोलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे.

- सलिल परांजपे, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com