Maharashtra Kesari 2023 : आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार, हर्षवर्धन सदगीरचा डबल धमाका की नवा महाराष्ट्र केसरी?

Maharashtra Kesari 2023 : आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार, हर्षवर्धन सदगीरचा डबल धमाका की नवा महाराष्ट्र केसरी?

पुणे | प्रतिनिधि

पुणे येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा (Maharashtra Kesari 2023) अंतिम टप्पा आला आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे आज (शनिवार) स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पार पडणार आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा दावेदार असून त्यामध्ये तो यशस्वी होतो का हे पाहणे औत्स्यूक्याचे ठरणार आहे.

माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने थेट एक टांग डाव टाकला अन शुभमचा तोल गेला, आणि मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्र गायकवाडने शुभमला थेट चीतपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसर्‍या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बालारफिक शेखला केवळ 30 सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. सिकंदर शेखने बाला रफिक शेखवर पहिल्या १५ सेकंदात ताबा मिळविताना २ गुणांची कमाई केली. त्यानंतर आपले आक्रमण अधिक धारधार करताना सिकंदर शेखने बाला रफिकवर भारंदाज डाव टाकताना कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये नेवून बलाराफिकला दाबत चीतपट करताना मैदान मारले. गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनला पुन्हा एकदा एक गुण मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३-० अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले व गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला मैदानाबाहेर ढकलताना ३ गुणांची कमाई केली. त्यावेळी गणेशने एकदा शिवराजला मैदानाबाहेर ढकलत एक गुण वसूल केला. त्यानंतर शिवराजने दुहेरी पट काढताना २ गुण मिळविताना ५-१ अशी आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत मात्र शिवराजने अजून आक्रामक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत २, झोळी डावावर २ आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेऊन २ असे तब्बल ६ गुण वसूल करताना गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com