
पुणे | Pune
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणार्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात रंगणार आहे...
या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा.रामदास तडस व ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजयकुमार सिंह,माजी खासदार अशोक मोहोळ, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे आणि पदाधिकारी, कुस्तीगीर आदी उपस्थित होते.
सलग पाच दिवस रंगणार थरार
47 तालीम संघातील 900 मल्ल होणार सहभागी
इतर नामांकित 40 मल्लही सहभाग घेणार
विविध 10 वजनी गटात गादी आणि माती विभागात होणार स्पर्धा
90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकार्यांचा सहभाग
10 जानेवारीला उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन 10 जानेवारीला होणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, योगेश्वर दत्त व साक्षी मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.