KKR vs CSK : कोलकातावर विजय मिळवून चेन्नई बाद फेरी निश्चित करणार का?

KKR vs CSK : कोलकातावर विजय मिळवून चेन्नई बाद फेरी निश्चित करणार का?

अबू धाबी | Abu Dhabi

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) आज रविवारी दोन महामुकाबले आयपीएल चाहत्यांना आज पाहण्याची संधी मिळणार आहे. यातील पहिला सामना आयपीएल २०१२ आणि २०१४ चे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात अबूधाबीच्या शेख झाएद मैदानावर (Sheikh Zayed Stadium) खेळवण्यात येणार आहे….

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता करण्यात येणार आहे. आयपीएल २०२१ च्या बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता कोलकात्यावर विजय मिळवून बाद फेरी निश्चित करण्यासाठी चेन्नई सज्ज आहे.

तर दुसरीकडे ४ महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आयपीएल यूएईत (UAE) परतले आहे. पहिल्या हाफमध्ये झालेल्या खराब खेळानंतर कोलकता नाईट रायडर्स (KKR) संघाने आपल्या सुरुवातीचे दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघांचा दणदणीत पराभव करून सलग दोन विजय नोंदवले आहेत.

आता आज होणाऱ्या सामन्यात बलाढ्य चेन्नईवर (CSK) विजय मिळवून आपला सलग तिसरा विजय संपादन करून गुणतालिकेत चौथ्या स्थानावरुन थेट तिसरे स्थान गाठण्यासाठी केकेआर (KKR) सज्ज झाला आहे.

मागील दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे आणि फलंदाजांनी केलेल्या आकर्षक टोलेबाजीमुळे कोलकाता संघाला सहज विजय मिळवला होता. आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात डावखुरा युवा सलामीवीर वयंकटेश अय्यरने सर्व क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले आहे.

मात्र संघासाठी चिंतेची गोष्ट म्हणजे सलामीवीर शुभमन गील, नितीश राणा, ऑईन मॉर्गन अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत त्यांना आपला खेळ उंचावण्याची सुवर्णसंधी आहे.

कोलकाता संघाप्रमाणेच चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी मोठी खेळी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आजच्या सामन्यात धोनी, सुरेश रैना चमकणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात सलामीवीर फाफ डू प्लेसिस याने ९५ धावांची खेळी साकारून चेन्नईला २० षटकात २२० धावांपर्यंत मजल मारून दिली होती. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाचे आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते.

मात्र पॅट कमिन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी झळकावलेल्या शानदार अर्धशतकामुळे कोलकाता संघाला २०० चा टप्पा गाठून दिला होता. या सामन्यात कोलकाता संघाला १८ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

चेन्नई संघाच्या फलंदाजीची मदार फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, रॉबिन उथापा, महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये रविंद्र जडेजा, मिचेल सॅन्टेनेर, डीजे ब्रावो, सॅम करण, मोईन अली आहेत. गोलंदाजीत दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, जेसन बेरेंडॉफ, लुंगी इंगिडी, कर्ण शर्मा आहेत.

कोलकाता संघाच्या फलंदाजीची मदार दिनेश कार्तिक, ऑईन मॉर्गन, करुण नायर, राहुल त्रिपाठी, शुभमन गील, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, टीम सॅफरीट, रिंकूसिंग यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये बेन कटिंग, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पवन नेगी आहेत. गोलंदाजीत टीम साऊथी, लोकि फेर्ग्युसन, संदीप वॉरियर, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, हरभजनसिंग, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.