KKR vs PBKS : आज कोलकाता विरुद्ध पंजाब निर्णायक लढत

KKR vs PBKS : आज कोलकाता विरुद्ध पंजाब निर्णायक लढत

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ च्या (IPL 2021) हंगामाचा रोमांच आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघांनी बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे...

तिसऱ्या स्थानावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाच्या खात्यात १४ गुण जमा आहेत. त्यांना आपल्या उर्वरीत ३ सामन्यांमध्ये १ विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे.

मात्र गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपली मोहोर उमटवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्ज (PBKS), आणि राजस्थान रॉयल्स (RR) शर्यतीत आहेत. सध्या चौथे स्थान मिळवण्यासाठी हे चारही संघ कडवी झुंज देत आहेत.

आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab kings) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे.

यंदाच्या विवो आयपीएल २०२१ मध्ये पहिल्या ७ सामन्यांमध्ये २ विजय आणि ५ पराभव अशी अडखळती सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुसऱ्या हाफमध्ये दणक्यात कमबॅक केला आहे.

त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर १ धावेने पराभव कोलकाता संघाच्या पदरी पडला आहे.

आता पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून विजयी षटकार मारण्यासाठी ऑईन मॉर्गनचा केकेआर सज्ज आहे. मात्र पंजाबला हलक्यात घेणे कोलकाता संघाला प्रचंड महागात पडू शकते. पंजाब संघाने हैद्राबादविरुद्ध (SRH) २० षटकात १२५ धावा धावफलकावर उभारूनही हैद्राबाद संघाला १२० धावांवर रोखले होते.

कोलकाता संघाचे आघाडीचे सर्व फलंदाज शारजा येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १२८ धावांचा पाठलाग करताना आकर्षक फटके मारण्यात झटपट तंबूत परतले. त्यामुळे सामना हातातून निसटतो की काय? अशी भीती कोलकता संघाच्या समर्थकांच्या मनात निर्माण झाली होती.

कोलकाता संघाचा अनुभवी अष्टपैलू सुनील नारायण याने कांगिसो रबाडाच्या षटकात २० धावा वसूल केल्यामुळे सामन्याचे पारडे कोलकाताच्या बाजूने फिरले. त्यांना ३ विकेट्सने रोमहर्षक विजय नोंदवून दिला.

मात्र या सामन्यात राहुल त्रिपाठी, शुभमन गील, दिनेश कार्तिक आणि कर्णधार ऑईन मॉर्गन स्वस्तात तंबूत परतले. त्यांना आपली कामगिरी उंचावण्याची ही अखेरची संधी आहे.

मात्र चेन्नईविरुद्ध झालेल्या रोमहर्षक सामन्यात संघाचा अनुभवी आणि धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेलला क्षेत्रक्षण करताना गंभीर दुखापत झाली होती. तेज गोलंदाज लोकी फेर्गसन हाही दिल्लीविरुद्ध सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता.

त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजच्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू उपलब्ध होणार का? हे नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट होईल.

पंजाब संघाबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार लोकेश राहुल वगळता क्रिस गेल, निकोलस पुरण अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले असल्यामुळे कर्णधार लोकेश राहुलवरील दडपण वाढले आहे. आजच्या सामन्यात युनिव्हर्स बॉस गेल आपली फलंदाजीतील चमक दाखवणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.