
दिल्ली | Delhi
भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फिटनेसच्या कारणास्तव या मालिकेत देखील खेळू शकणार नाहीये.
जसप्रीत बुमराहला आधी वनडे मालिकेसाठी संघामध्ये स्थान मिळालं नव्हतं. पण ३ जानेवारीला जसप्रीत बुमराहचा वनडे स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला. या निर्णयानंतर, अवघ्या ६ दिवसात तो बाहेर पडला. श्रीलंकेविरुद्धचा पहिला वनडे सामना १० जानेवारी (मंगळवार) रोजी गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.
जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो टी-२० विश्वचषकही खेळू शकला नाही. यानंतर, त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम केले आणि त्याला तंदुरुस्त घोषित देखील करण्यात आले.
एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यानंतरच टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय संघात समावेश केला होता, परंतु आता अचानक त्याला अधिक विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.