चेन्नई l Channai

आज (१८ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये पार पडलेल्या इंडियन् प्रीमीयर लीगच्या (IPL) १४ व्या हंगांमाच्या लिलावात अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. अनेक संघांनी कोट्यावधींच्या बोली लावत काही स्टार खेळाडू आपल्या संघात दाखल करुन घेतले.

दरम्यान, या लिलावात एक मजेदार दृश्य पाहायला मिळाले जेव्हा देशांतर्गत स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) पंजाब किंग्सने (Punjab Kings) आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाबने त्याच्यासाठी ५ कोटी २५ लाख मोजले. २५ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या शाहरुख खान आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू असल्याने त्याची या लिलावासाठी २० लाख ही मुळ किंमत होती. पण त्याच्यासाठी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात कोट्यावधी रुपयांची बोली लावण्याची स्पर्धा सुरु झाली. अखेर ५ कोटी २५ कोटी रुपयांची बोली लावत पंजाब किंग्सने त्याला आपल्या ताब्यात घेतले.

शाहरुख तामिळनाडू संघाकडून क्रिकेट खेळला असून त्याने ५ प्रथम श्रेणी सामने, २० अ दर्जाचे सामने व ३१ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत. शाहरुखने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३१ धावा, अ दर्जाच्या सामन्यात २८६ धावा व ३ विकेट आणि ट्वेंटी ट्वेंटीमध्ये २९३ धावा व २ विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, शाहरुखला ताफ्यात सामील केल्यानंतर प्रितीच्या आनंदाची सीमाच नव्हती. प्रितीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी असलेली प्रिती जागेवरच नाचू लागली.