
मुंबई | Mumbai
आयपीएलमध्ये (IPL) शुक्रवारी १२ मे २०२३ रोजी मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाशी होणार आहे. आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) बाद फेरीत आपले स्थान कायम राखणयासाठी मुंबई इंडियन्स संघाला आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या खात्यात ११ सामन्यांमध्ये ६ विजय आणि ५ पराभवांसह १२ गुण आहेत...
गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर विजय संपादन करून आयपीएल २०२३ मध्ये आपला सातवा सामना जिंकण्यासाठी आणि अहमदाबाद येथील पहिल्या साखळी सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहे. दुसरीकडे मुंबईवर मात करून आयपीएल २०२३ स्पर्धेच्या बाद फेरीत अव्वलस्थान कायम राखण्यासाठी गुजरात टायटन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज असणार आहे.
आयपीएल २०२३ चा निर्णायक टप्पा आता सुरु झाला आहे. बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला ३ सामन्यांमध्ये किमान २ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. गुजरातविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागल्यास त्यांची वाट अधिकच खडतर होणार आहे. अहमदाबाद येथील पराभव विसरून यंदाच्या हंगामात मुंबईवर दुसऱ्यांदा विजय संपादन करण्यासाठी गुजरात टायटन्स काही खास डावपेचांसह मैदानात उतरणार आहे.
आरसीबी संघावरील विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाला विजयाचा सूर अखेर गवसला आहे. गुजरातविरुद्ध आपली विजयी मोहीम कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक असणार आहे. गुजरातने आपल्या अखेरच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघावर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही संघांची कामगिरी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली झाली आहे.
दोन्ही संघांची तुलना करायची झाल्यास आजच्या सामन्यात गुजरात संघाला विजयासाठी सर्वाधिक संधी असणार आहे. मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी गुजरात संघाच्या तुलनेत कमकुवत दिसत आहे. गुजरातकडे फलंदाजी आणि गोलंदाजीत मुंबईच्या तुलनेत सर्वाधिक संतुलन आहे . सामना मुंबईच्या मैदानावर होणार असल्यामुळे गुजरातला कडवी झुंज देण्यासाठी मुंबई सज्ज असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.