
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात मुंबईच्या संघाने बाजी मारली.
मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाकडून कर्णधार डेविड वॉर्नर व पृथ्वी शॉ सलामीस फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या षटकात ऋतिक शोकिनच्या गोलंदाजीवर कॅॅमेराॅॅन ग्रीनने पृथ्वी शॉला झेल बाद करत दिल्लीच्या संघाला पहिला धक्का दिला.पृथ्वी शॉने १० चेंडूत ३ चौकार लगावत १५ धावा केल्या. सामन्याच्या ९व्या षटकात पियुष चावलाच्या गोलंदाजीवर जेसन बेहरेनडॉर्फने मनीष पांडेला झेल बाद केले. मनीष पांडेने १८ चेंडूत ५ चौकार लगावत २६ धावा केल्या.
रायली मेरेडिथच्या गोलंदाजीवर नेहल वाधेराने यश धुलला झेल बाद केले. यश धुलने ४ चेंडूत २ धावा केल्या.पाठोपाठ अकराव्या षटकात पियुष चावलाने रोव्हमन पॉवेलला पायचीत करत दिल्लीच्या संघाला चौथा धक्का दिला. रोव्हमन पॉवेलने ४ चेंडूत ४ धावा केल्या. १२व्या षटका अखेर ४ गडी बाद ९५ धावा अशी स्थिती दिल्लीच्या संघाची होती.१३व्या षटकात पियुष चावलाने ललित यादवला त्रिफळाचीत करत २ धावांवर माघारी पाठविले.
दिल्लीच्या संघाकडून अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी केली.जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर अर्शद खानने अक्षर पटेलला झेल बाद केले. अक्षर पटेलने २५ चेंडूत ५ षटकात व ४ चौकार लगावत एकूण ५४ धावा केल्या. १९ व्या षटकात जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर रायली मेरेडिथने डेविड वॉर्नरला झेल बाद केले. डेविड वॉर्नरने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. पाठोपाठ अभिषेक पोरेल १ धाव तर एम रेहमान शून्यावर बाद होत तंबूत परतले. विसाव्या षटकाचे दोन चेंडू शिल्लक असताना दिल्लीच्या संघाचे सर्व गडी बाद गडी बाद १७२ धावा झाल्या.
मुंबईच्या संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन प्रथम फलंदाजीस आले. कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशनने सुरवाती पासूनच आक्रमक फलंदाजी सुरु केली. सामन्याच्या ८व्या षटकात महेश कुमारने ईशान किशनला धावचीत करत मुंबईच्या संघास पहिला धक्का दिला. ईशान किशनने २६ चेंडूत ६ चौकार लगावत एकूण ३१ धावा केल्या. १०व्या षटकाअंती १ गडी बाद ९२ धावा अशी स्थिती मुंबईच्या संघाची होती.
सोळाव्या षटकात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने टिळक वर्माला झेल बाद केले. टिळक वर्माने २९ चेंडूत ४ षटकार व १ चौकार लगावत एकूण ४१ धावा केल्या तर टिळक वर्मा पाठोपाठ मैदानात सूर्यकुमार यादवला कुलदीप यादवने झेलबाद करत शून्यावर माघारी पाठविले. सामन्याच्या १७ व्या षटकात एम. रहमानच्या गोलंदाजीवर अभिषेक पोरेलने रोहित शर्माला झेल बाद केले.रोहित शर्माने ४५ चेंडूत ४ षटकार व ६ चौकार लगावत ६५ धावा केल्या.
शेवटच्या दोन षटकातील अटी तटीच्या सामन्यात टीम डेविड व कॅॅमेराॅॅन ग्रीनच्या जोडीने मुंबईच्या संघाचा विजय निश्चित केला.१ चेंडूत २ धावांची आवश्यकता असताना टीम डेविडने शेवटच्या चेंडूत मुंबईच्या संघाला विजय मिळवून दिला.