
जयपूर | Jaipur
आयपीएलमध्ये (IPL) शुक्रवारी ५ मे २०२३ रोजी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा सामना आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाशी होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे....
आयपीएल १६ मधील ४८ वा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ५ विजय आणि ४ पराभव स्वीकारून १० गुणांची कमाई केली आहे.
आजच्या सामन्यात विजय संपादन करून आयपीएल २०२२३ मध्ये विजयी षटकार मारण्यासाठी राजस्थान रॉयल्स आपल्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी उत्सुक असणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये ३ सामने खेळवण्यात आले होते. या ३ सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर सहज विजय संपादन केला होता.
तसेच आयपीएल २०२३ मध्ये झालेल्या अहमदाबाद येथील पहिल्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने गुजरात संघावर मात केली होती. या पराभवाची परतफेड करण्यासाठी गुजरात टायटन्स नवीन डावपेचांसह आणि नवीन रणनीती आखून मैदानात उतरणार आहे.
विशेष म्हणजे दोन्ही संघांना आपल्या अखेरच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरात टायटन्स संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाने पराभूत केले आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाला रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने पराभूत केले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यातील पराभव विसरून अव्वल २ संघांमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स उत्सुक असतील.
आयपीएल २०२३ मधील दोन्ही संघांची कामगिरी पाहिल्यास गुजरात संघाची कामगिरी अधिक सरस आहे. आयपीएल गुणतालिकेत गुजरात पहिल्या तर राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स संघावर मात करून बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे.
सलिल परांजपे, नाशिक.