
मुंबई | Mumbai
आयपीएल १६ (IPL 16) मध्ये आज शनिवार (दि.६) रोजी डबल हेडर सामने खेळविण्यात येणार असून पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) दुपारी ३:३० वाजता होणार आहे. तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० वाजता बंगळुरु आणि दिल्ली (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.
यंदाच्या मोसमातील १२ व्या सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स रोमांचक सामन्यात पराभव केला आहे. मुंबई या पराभवाचा बदला घेणार की चेन्नई पुन्हा बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. मागच्या सामन्यात लखनौमध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ संघातील सामना रद्द झाला आणि दोन्ह संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. चेन्नई संघ मागील तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर विजयाच्या शोधात आहे. तर मुंबईची विजयी वाटचाल सुरु आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आतापर्यंत त्यांच्या घरच्या मैदानावर चार सामने खेळले आहेत. यापैकी तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला असनू संघाला फक्त एक सामना जिंकता आला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच बंगळुरु संघ आणि विराट कोहली दिल्लीच्या मैदानावर येणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांचा शेवटचा सामना जिंकला आहे आणि विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.