
कोलकाता | वृत्तसंस्था Kolkata
कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात IPL-2023चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात चेन्नईच्या संघाने बाजी मारली.
नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाकडून आज तीन खेळाडूंनी अर्धशतक पूर्ण करत कोलकात्याच्या संघापुढे २३६ धावांचे आव्हान दिले. चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड व डेव्हन काॅॅन्वे सलामीस फलंदाजीस आले. सामन्याच्या आठव्या षटकात सुयश शर्माने ऋतुराज गायकवाडला त्रिफळाचीत केले. ऋतुराज गायकवाडने २० चेंडूत ३ षटकार व २ चौकार लगावत ३५ धावा केल्या. तेराव्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वाइझने डेव्हन काॅॅन्वेला झेल बाद केले. डेव्हन काॅॅन्वेने ४० चेंडूत ३ षटकार व ४ चौकार लगावत ५६ धावा केल्या.
शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी केली.अठराव्या षटकात कुलवंत खेजरोलियाच्या गोलंदाजीवर जेसन रॉयने शिवम दुबेला झेल बाद केले.शिवम दुबेने २१ चेंडूत ५ षटकार व २ चौकार लगावत ५० धावा केल्या. 20 व्या षटकात कुलवंत खेजरोलियाच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने रवींद्र जाडेजाला झेल बाद केले.रवींद्र जाडेजाने ८ चेंडूत १८ धावा केल्या. २०व्या षटकाअंती चेन्नईच्या संघाने ४ गडी बाद २३५ धावा केल्या.
कोलकात्याच्या संघाकडून जगदीश नारायण व सुनील नारयण प्रथम फलंदाजीस आले. कोलकात्याच्या संघाची फलंदाजीची सुरवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने जगदीश नारायणला झेल बाद करत कोलकाताच्या संघास पहिला धक्का दिला. जगदीश नारायणने ३ चेंडूत १ धाव केली. पाठोपाठ दुसऱ्या षटकात आकाश सिंगने सुनील नारयणला त्रिफळाचीत करत शून्य धाव संख्येवर तंबूत पाठविले.
आठव्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर व्यंकटेश अय्यर पायचीत झाला. व्यंकटेश अय्यरने २० चेंडूत २० धावा केल्या. नवव्या षटकात रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने नितीश राणाला झेल बाद केले. नितीश राणाने २० चेंडूत २७ धावा केल्या. 15 व्या षटकात महेश थीकसानाने जेसन रॉयला त्रिफळाचीत केले. जेसन रॉयने २६ चेंडूत ६१ धावा केल्या. सोळाव्या षटकात शिवम दुबे करवी आंद्रे रसेल झेल बाद होत अवघ्या ९ धावा करत तंबूत परतला. पाठोपाठ उमेश यादव ही ४ धावांवर माघारी परतला. २०व्या षटकाअंती कोलकाताचा संघ ८ गडी बाद १८६ धावा केल्या.
चेन्नईच्या संघाने कोलकातावर ४९ धावांनी विजय मिळविला.