IPL 2021: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार सामना

RCB गुणतालिकेत अव्वल राहणार?; कसा असेल संभाव्य संघ
IPL 2021: आज  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार सामना

मुंबई | Mumbai

IPL च्या चौदाव्या हंगामातील सहावा सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderabad) हा सामना होत आहे.

हैदराबाद आपल्या पाहल्या विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील तर बेंगलोर आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) पाच वेळा गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून यंदाच्या आपल्या मोहिमेची सुरुवात केली तर वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.

बंगळुरुने पहिला सामना जिंकला असला तरी फलंदाजांच्या कामगिरीमुळे चिंता आहे. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या संघात काही बदल केले जातील. मागील पर्वात चांगली कामगिरी केलेला देवदत्त पडीक्कल आता फिट आहे. करोनावर मात करत तो संघात परतला आहे. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यात हैदराबादची कामगिरी निराशाजनक राहिली. आघाडीच्या फलंदाजांसोबत वेगवान गोलंदाज चांगला कामगिरी करु शकले नाही. तर केन विलियमसन दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. त्याचं या सामन्यात खेळणं अवघड आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतरही संघात कोणताही बदल होणं कठीण आहे.

चेन्नईचे चेपॉक स्टेडियम मैदान फिरकीपटूंसाठी चांगलं असल्याचं मानलं जातं. आतापर्यंत या मैदानावर तीन सामने झाले आहेत. त्यामुळे खेळपट्टी येत्या सामन्यात आणखी स्लो होत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करणं योग्य असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. तर फिरकीपटूंची जादू चालली तर मात्र सामन्याचं चित्र पालटून जाईल.

दरम्यान, आरसीबीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार विराट कोहलीने फटकावल्या आहेत, तर हैदराबादसाठी सर्वाधिक धावा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने फटकावल्या आहेत. वॉर्नरने बंगळुरुविरुद्ध ५९३ धावा फटकावल्या आहेत. तर विराटने हैदराबादविरुद्ध ५३१ धावा फटकावल्या आहेत.

आयपीएल २०२० मध्ये लीग राऊंडमध्ये दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांनी त्यावेळी एकेक सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आले. हा सामना हैदराबादने जिंकला होता.

..असा असेल संभाव्य संघ

सनराइजर्स हैदराबाद

डेविन वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, मनिष पांडे, मोहम्मद नबी, विजय शंकर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, संदीप शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलिअर्स, रजत पाटीदार, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, काइल जेमिसन, डॅनिअल ख्रिश्चियन, यजुवेंद्र चहल

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com