IPL 2021 : विजयी चौकारासाठी पंजाब, राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत

IPL 2021 : विजयी चौकारासाठी पंजाब, राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ चा (IPL 2021) थरार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे....

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्स संघ (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात विजय नोंदवणाऱ्या संघाला गुणतालिकेत थेट चौथ्या स्थानावर छलांग मारण्याची संधी आहे.

राजस्थान आणि पंजाब दोन्ही संघांमध्ये अनेक मातब्बर खेळाडू असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहायला मिळण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना आहे. पंजाब आणि राजस्थान संघांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण असून सरस धावगतीमुळे राजस्थान सहाव्या तर पंजाब सातव्या स्थानावर आहे. मात्र या सामन्यात राजस्थान संघापेक्षा पंजाब संघाला विजयासाठी फेव्हरेट समजले जात आहे.

राजस्थान संघाच्या हुकमी शिलेदार जोस बटलर (Jos Buttler), जोफ्रा आर्चर (Jofra Archer), बेन स्ट्रोक्स (Ben Stokes) यांनी आयपीएल २०२१ मधून माघार घेतल्यामुळे इविन लुईस, फिलिप्स आणि ओशन थोमस यांचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

यशस्वी जयस्वाल आणि लुईस राजस्थान रॉयल्स संघाच्या डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे. तर क्रिस मॉरिस आणि कर्णधार संजू सॅमसन यांना अधिक जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्ज संघासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे कर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) तुफान लयीत आहे. मयंक अगरवाल (Mayank Agarwal), क्रिस गेल (chris gayle) आणि डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरण (Nicholas Pooran) यांच्याकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित आहे.

राजस्थान संघाप्रमाणे पंजाब संघातही आदिल रशीद (Adil Rashid) आणि दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज एडम मार्क्रम (Aiden Markram) संघात असल्यामुळे अंतिम ११ संघाची निवड करताना दोन्ही संघांच्या कर्णधारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पहिल्या हाफमध्ये मुंबईत झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थान संघाला रोमांचक सामन्यात ४ धावांनी पराभूत केले होते. याचा वचपा काढण्यासाठी राजस्थान सज्ज आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.