IPL 2021 : आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, चेन्नई पहिला विजय नोंदवणार?

IPL 2021 : आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, चेन्नई पहिला विजय नोंदवणार?
PBKS vs CSK

मुंबई | Mumbai

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आठवा सामना आज पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांना भिडणार आहे. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या मोसमातील पहिला सामना खेळला आहे. चेन्नईला पहिल्या मॅचमध्ये दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाबने राजस्थानचा पराभव केला होता.

या हंगामातील पहिल्याच लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या हातून चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे या दारुण पराभवाचा वचपा काढत हंगामातील पहिला विजय साजरा करण्याचा त्यांचा हेतू असेल. दुसरीकडे विजयी सलामीसह हंगामाचा श्रीगणेशा झाल्याने पंजाबचा आत्मविश्वास दुणावला असेल. राजस्थान रॉयल्स संघाला त्यांनी ४ धावांनी चितपट केले होते. अशात या सामन्यातही विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पंजाब संघ पहिल्या सामन्यातील तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरु शकतो. या सामन्यात कर्णधार केएल राहुलला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

दुसरीकडे, मागील सामन्याप्रमाणे ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस चेन्नईकडून डावाची सुरुवात करतील. सुरेश रैना, रविंद्र जडेजा, मोईन अली यांना मधल्या फळीत पाठवले जाईल. गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर आणि सॅम करन यांच्या खांद्यावर असेल. चेन्नईचा नवनियुक्त शिलेदार जेसन बेहरनडोर्फ आणि लुंगी एन्गिडी या सामन्यातही खेळताना दिसणार नाहीत. या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होण्यास अजून थोडा वेळ बाकी असल्याने त्यांना संधी दिली जाणार नाही.

आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब संघ यांच्यात २३ सामने झाले आहेत. त्यापैकी चेन्नईने १४, तर पंजाबने ९ सामन्यांत विजय मिळविला आहे. पंजाबविरुद्धच्या शेवटच्या ५ पैकी ४ सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे.

संभाव्य संघ...

चेन्नई सुपर किंग्स

एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्‍लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम करन, ड्वायेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

पंजाब किंग्ज

केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, क्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रवि बिश्‍नोई, मोहम्‍मद शमी, अर्शदीप सिंह.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com