IPL 2021 : आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात चेन्नईने केला विजयाचा श्रीगणेशा

मुंबईचा २० धावांनी पराभव
IPL 2021 : आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात चेन्नईने केला विजयाचा श्रीगणेशा

दिल्ली | Delhi

आयपीएलच्या १४ व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.

चेन्नई सुपर किंग्सची ४ बाद २४ अशी अवस्था असताना मराठमोठा ऋतुराज गायकवाड मैदानात एकटा मुंबई इंडियन्सला भिडल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाने १५६ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईने यावेळी २० धावांनी मुंबई इंडियन्सवर विजय साकारला. ऋतुराजने यावेळी ९ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ८८ धावांची खेळी साकारली होती. ड्वेन ब्राव्होने यावेळी तीन विकेट्स मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ऋतुराजने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. त्याच्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी मैदानात आला. ७ चेंडूत २३ धावांची खेळी करून ब्राव्हो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने ३ षटकार ठोकले. ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकत चेन्नईला २० षटकात ६ बाद १५६ धावा अशी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून डी कॉक आणि पदार्पणवीर अनमोलप्रीत ची जोडी सलामीला उतरली. मात्र, ही जोडी फार काळ टिकू शकली नाही. डी कॉकला चाहरने तिसऱ्या षटकात १७ धावांवर पायचीत केले. तर चाहरनेच आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनमोलप्रीतला १६ धावांवर त्रिफळाचीत करत मुंबईला दुसरा धक्का दिला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला ठाकूरने बाद करत स्वस्तात माघारी धाडले. यानंतर मुंबई फलंदाजांच्या पडझड सुरूच राहिली. काहीवेळी सौरभ तिवारी आणि ईशान किशन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रावोने ११ धावांवर किशनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. हेजलवुडने पोलार्डला बाद करत मुंबईचा अर्धा संघ तंबूत धाडले. कृणाल पांड्याला धाव घेताना नॉन स्ट्राईकरवर असणाऱ्या तिवारीसोबत योग्य ताळमेळ साधता न आल्याने ब्रावोने त्याला धावचीत केलं. अखेरीस तिवारीने अॅडम मिल्नेसह काही शॉट्स खेळत संघाला विजयाच्या जवळ नेले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. मिल्ने १५ धावा करून परतला.

या विजयासह चेन्नईने आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध २१८ धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com