
बस्सेटेरे | basseterre
भारत विरुद्ध विंडीज (India vs West Indies) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना आज सोमवारी बस्सेटेरे येथील वॉर्नर पार्क मैदानावर (Warner Park Stadium) खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे...
भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता आजच्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेतील दुसरा सामना जिंकून ही आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी पाहुणा भारतीय संघ (Team India) आज मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघाचा नियमित सलामीवीर लोकेश राहुल (KL Rahul) मालिकेतून बाहेर झाला आहे. भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिल्या सामन्यातील विजयाने प्रचंड फॉर्मात असलेली टीम इंडिया आजच्या सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात पहिल्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या श्रेयस अय्यर याला सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्याजागी आयर्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या दीपक हुडला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात नव्या उमेदीने मैदानात उतण्यासाठी आज मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी विंडीज सज्ज असणार आहे. भारत आणि विंडीज टी २० मध्ये आतापर्यंत २१ वेळा एकमेकांसमोर आले आहेत.
यात भारताने १४ तर विंडीज संघाने ६ सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, निकोलस पुरण हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपे, नाशिक.