
मुंबई | Mumbai
भारत (IND) आणि श्रीलंका (SL) संघांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या द्विपक्षीय मालिकेला टी २० मालिकेनं सुरुवात होणार आहे. ३ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येणार आहे...
पहिला टी २० सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ६:५० वाजता होईल.
ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पार पडूनगेलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून मानहानीकारक पराभव पत्कारून माघारी परतलेल्या भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघाचं कर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे असणार आहे. तर सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचं उपकर्णधारपद असणार आहे.
या मालिकेतून भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा , लोकेश , राहुल , श्रेयस अय्यर , रिषभ पंत, विराट कोहली या पाचही महत्वाच्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. तसेच राहुल त्रिपाठी, शिवम मावी आणि मुकेश कुमार यांना भारतीय संघातून डेब्यू करण्याची संधी असणार आहे. हार्दिक पंड्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आयर्लंड आणि नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये पार पडून गेलेल्या टी २० मालिकेत मालिका विजय मिळवला आहे.
आता सलग तिसरी मालिका जिंकण्याचा हार्दिक अँड कंपनीचा प्रयत्न असणार आहे. राहुल त्रिपाठी याने आयपीएल २०२२ मध्ये सनराईझर्स हैद्राबाद संघाचं प्रतिनिधित्व करताना मोक्याच्या क्षणी आपल्या फलंदाजीच्या बळावर हैद्राबाद संघाला अनपेक्षित विजय संपादन करून दिले आहेत.
शिवम मावी आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून खेळला आहे. २०१८-२०२२ या चार वर्षात केकेआर संघाच्या विजयात अनेक सामन्यात आपल्या गोलंदाजीतून मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच अखेरच्या निर्णायक षटकांमध्ये आपल्या फलंदाजीतून कमाल करण्याची क्षमता त्याच्यात आहे. आता आयपीएलप्रमाणेच भारताकडूनही चमकदार कामगिरी करण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज असणार आहेत.
श्रीलंका संघाचं कर्णधारपद दसून शनाकाकडे असणार आहे. चरित असलंका उपकर्णधार असणार आहे. २०२२ मध्ये यूएईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियामधील वर्ल्डकप स्पर्धेत सुपर १२ मध्ये पराभूत होऊन श्रीलंका संघाचं विश्वविजेते बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं.
आता २०२४ मध्ये अमेरिका आणि विंडीजमध्ये टी २० वर्ल्डकप होणार आहे यासाठी नव्याने संघबांधणी करण्यासाठी आणि नवीन वर्षाची थाटात सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.
सलिल परांजपे नाशिक