
राजकोट | Rajkot
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर पाहुण्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघावर ४८ धावांनी विजय संपादन केला...
यामुळे मालिका पराभूत होण्याचे संकट काहीसे दूर झाले आहे. मात्र, यजमान भारतीय संघासमोर आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावर मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे.
आजच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ६:५० वाजता स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. सलामीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. भारतासाठी आजचा चौथा सामना 'करो या मरो' असा असणार आहे.
मात्र राजकोट सामन्यात मालिका विजयासाठी आफ्रिकेने कंबर कसली आहे. भारतीय कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सलामीचा सामन्यात मोठी खेळी करण्यात सातत्याने अपयशी ठरले आहेत. आजच्या निर्णायक सामन्यात दोन्ही खेळाडूंना अधिक जवाबदारीने खेळून मोठी खेळी साकारावी लागणार आहे.
पुण्याचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डावखुरा सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) यांनी भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात तारणारी सुरेख खेळी साकारली होती. गोलंदाजीचा विचार केल्यास हर्षल पटेल (Harshal Patel) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) फॉर्मात आहेत.
तसेच सलामीच्या २ सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या फिरकीपटू युझवेन्द्र चहल याने तिसऱ्या सामन्यात ३ महत्वपूर्ण विकेट्स काढून आपल्याला लय गवसली असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
राजकोट येथे आजवर तीन आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यात प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ २ वेळा विजयी ठरला आहे. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७७ इतकी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांसाठी नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो. आजच्या सामन्यात ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, टेम्बा बावूमा हे स्टार प्लेअर्स असतील.
सलिल परांजपे, नाशिक.