भारत विरुद्ध पाकिस्तान होणार महिला वर्ल्डकपचा सलामीचा सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान होणार महिला वर्ल्डकपचा सलामीचा सामना

मुंबई | Mumbai

नुकत्याच यूएईत (UAE) पार पडून गेलेल्या पुरुषांच्या टी २० वर्ल्डकप क्रिकेट (T20 cricket world cup) स्पर्धेत पहिल्या गट साखळी सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघानं टीम इंडियाचा (Team India) १० गड्यांनी दणदणीत पराभव करून भारताविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करून एक नवीन इतिहास रचला....

या ऐतिहासिक विजयानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुन्हा कधी रंगणार ? याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये रंगणाऱ्या महिलांच्या ५० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. या स्पर्धेचा उदघाटनाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध विंडीज या दोन संघांमध्ये रंगेल. तर स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार असून , ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध दोन हात करणार आहेत.

भारतीय महिला संघाला २ वेळा उपविजेतेपद मिळवता आलं आहे. तर विजेतेपदावर नाव कोरण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ आपलं पहिलं विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरणार का ? ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

भारतीय एकदिवसीय महिला संघाची कर्णधार मिताली राजची ही कदाचित अखेरची विश्वचषक स्पर्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या महिला कर्णधाराला विजयी निरोप देण्याच्या निमित्ताने भारतीय महिला संघ आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरेल यात काही शंका नाही.

विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये भारत , न्यूझीलंड , ऑस्ट्रेलिया , इंग्लंड , दक्षिण आफ्रिका या संघाना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे तर बांगलादेश , पाकिस्तान , विंडीज या संघांनी पात्रता फेरीच्या बळावर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे असे रंगतील भारताचे साखळी सामने :

६ मार्च पाकिस्तान बे ओव्हल तौरंगा.

१० मार्च न्यूझीलंड हॅमिल्टन.

१२ मार्च विंडीज हॅमिल्टन.

१६ मार्च इंग्लंड बे ओव्हल तौरंगा.

१९ मार्च ऑस्ट्रेलिया ईडन पार्क ऑकलंड.

२२ मार्च बांगलादेश हॅमिल्टन.

२७ मार्च दक्षिण आफ्रिका क्राईसचर्च.

सलिल परांजपे नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com