Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई | Mumbai
संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज (दि.२ सप्टेंबर) रोजी आशिया चषक २०२३ (Asia Cup 2023) स्पर्धेतील पहिला महामुकाबला होणार आहे. श्रीलंकेतील (Sri Lanka) कँडी येथे हा सामना खेळविला जाणार असून दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करुन सज्ज झाले आहेत...

या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच पाकिस्तान संघाने (Pakistan Team) आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. त्यांतर भारतीय संघ (Indian Team) देखील आपली प्लेइंग इलेव्हन नाणेफेकीपूर्वी कधीही जाहीर करु शकतो. मात्र, हा समाना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकणे देखील महत्वाचे आहे.
आशिया चषकात (Asia Cup) भारत आणि पाकिस्तान १७ व्यांदा सामोरासमोर येणार आहेत. आशिया चषकाच्या मागील १५ हंगामात दोन्ही संघ टी २० आणि एकदिवसीय फॉरमॅटसह एकूण १६ वेळा आमनेसामने उभे ठाकले आहेत. या १६ सामन्यांपैकी एका सामन्याचा (वर्ष १९७) निकाल लागला नाही. उर्वरित १५ सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे.
१९८४ ते २०१८ या कालवधीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये एकूण १३ सामने खेळविण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारताने सात वेळा पाकिस्तानला पराभूत केले आहे. तर पाकिस्तानने पाच वेळा भारतावर विजय मिळविला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. तर आशिया चषकाच्या टी २० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारताने आणि एका सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आहे.
इशान किशन की संजू सॅमसन कुणाला मिळणार संधी?
भारतीय संघात लोकेश राहुलशिवाय इशान किशन आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. सॅमसन राखीव खेळाडू म्हणून संघासोबत आहे. अशा स्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षकाच्या स्थानाबाबत साशंकता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन सामन्यांत अर्धशतकं झळकावल्यानंतर इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, त्याने डावाची सुरुवात करताना तिन्ही अर्धशतके झळकावली असून सध्याच्या संघात रोहित शर्मा शुबमन गिलसह डावाची सुरुवात करेल. विराट तिसऱ्या क्रमांकावर आणि अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत पाचव्या क्रमांकाची जागा यष्टिरक्षकासाठी रिक्त आहे.
भारतीय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानची प्लेईंग - ११
बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.