IND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड दुसरा महत्वपूर्ण सामना

IND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड दुसरा महत्वपूर्ण सामना

रांची | Ranchi

जयपूर (Jaipur) येथील सलामी सामन्यात न्यूझीलंडवर (New Zealand) रोमहर्षक लढतीत ५ विकेट्सने विजय मिळवून जबरदस्त फॉर्मात परतलेली टीम इंडिया (India) आज रांची येथे होणारा सामना जिंकून मालिकेवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज आहे...

हा सामना न्यूझीलंड संघासाठी करा वा मरा असा असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी किवी संघ सज्ज आहे. रांचीच्या मैदानावर टीम इंडियाने २ सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवून तिसरा विजय रांचीच्या मैदानावर साजरा करण्यासाठी रोहित सेना सज्ज आहे. शिवाय टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांना न्यूझीलंडविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) कमालीचा फॉर्म गवसला आहे. आता हा फॉर्म कायम राखण्यासाठी कर्णधार रोहित आणि सूर्यकुमार यादव आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

तर टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला जयपूर येथील सलामी सामन्यात आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नव्हती. त्यांना आजच्या सामन्यात आपली फलंदाजी आणखीन बहारदार करण्याची संधी आहे.

भारतीय संघात आज तेज गोलंदाजीत दोन महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. दीपक चाहरजगी हर्षल पटेलला तर मोहंमद सिराजच्या बदली आवेश खानला संधी मिळू शकते. आयपीएल २०२१ मध्ये दोन्ही गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आयपीएल २०२१ मध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीच्या पाच गोलंदाजांमध्ये आपले स्थान मिळवले होते. आता भारताकडून आपला ठसा उमटवण्यासाठी दोघेही गोलंदाज सज्ज आहेत.

दुसऱ्या सामन्यात प्रेक्षक १०० टक्के आपली उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. कारण आजच्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. शिवाय नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आजचा सामना रद्द होण्याची शक्यता

भारतात कोरोना महामारीचे संकट अद्याप संपलेलं नाही. अशातच सामना रद्द केला जाण्याची शक्यता आहे. कारण या सामन्याच्या आयोजनासंदर्भात काही जणांनी थेट झारखंड कोर्टात याचिका दाखल केली आहे. यात सामना पाहण्यासाठी ५० टक्के क्षमतेनं खेळवण्यात यावा. किंवा प्रेक्षकांना मैदानात प्रवेश नाकारण्यात यावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भारत न्यूझीलंड दुसरा सामना होणार का ? नाही याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com