
मुंबई | Mumbai
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज (रविवार) भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना मैदानावर दुपारी दोन वाजता सुरु होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. आजचा सामना (Match) दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाचा असणार आहे...
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ५ सामने खेळले असून या पाचही सामन्यात विजय संपादन केला आहे. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध विजेतेपदाचा षटकार मारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. इंग्लंडला (England) श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
भारतीय संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) विजय संपादन केला होता. त्यानंतर आता सात दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध विजय संपादन करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. तर भारतीय संघाचा मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडया दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध तो खेळू शकणार नाही.
तसेच आतापर्यंत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड ८ वेळा आमनेसामने आले असून इंग्लंडने ४ व भारताने ३ सामन्यात विजय मिळविला आहे. तर १ सामना टाय झाला आहे. याशिवाय सध्या इंग्लंडकडून डेविड मलान, जो रुट वगळता इतर सर्व फलंदाज मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरले आहेत. यामध्ये कर्णधार जोस बटलर, जोनी बेरसटो, लियम लिंगविस्टन, सॅम करण, बेन स्ट्रोकसला अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही.तर गोलंदाजीमध्ये आदिल रशिद, एटकिंसन, संघाला बळी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत.
दुसरीकडे भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली,लोकेश राहुल, श्रेयस अय्यर,शुभमन गील चांगल्या फॉर्मात आहेत. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा अडसर दूर करत संघाला विजय मिळवून देत आहेत.
सलिल परांजपे, नाशिक