भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका उद्यापासून

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका उद्यापासून

ऑकलंड | auckland

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघांमधील ३ सामन्यांची टी २० मालिका भारतीय संघाने अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात १-० अशा फरकाने जिंकली आहे.

आता दोन्ही संघांमध्ये येत्या शुक्रवारपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे असणार आहे. भारतात पुढील वर्षी आयसीसी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीनं भारत आणि न्यूझीलंड संघाला आपल्या संघाची नव्याने बांधणी करण्याची संधी असणार आहे. पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड संघाचं कर्णधारपद केन विलियम्सन सांभाळणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण अमेझॉन प्राईम व्हिडिओवर भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंका, विंडीज , दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मालिका विजय साकारला आहे. आता न्यूझीलंड संघाला पराभूत करून चौथी मालिका खिशात टाकण्यासाठी शिखर धवन अँड कंपनी सज्ज असणार आहे.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रिषभ पंतकडे उपकर्णधारपद कायम असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होऊन गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी सरशी साधली होती. मात्र शुभमन गिल , शिखर धवन , या दोन्ही खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

त्यांना आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्याची संधी असणार आहे. या मालिकेतून वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला भारतीय संघातून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे टी २० मालिकेतील पराभव विसरून एकदिवसीय मालिकेत विजयी सुरवात करण्यासाठी न्यूझीलंड नवीन रणनीती आखून मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे श्रेयस अय्यर संजू सॅमसन फॉर्मात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात झालेल्या एकदिवसीय मालिकेत दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाच्या मालिका विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि शुभमन गिल मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांमध्ये ११० एकदिवसीय सामने झाले आहेत यामध्ये भारताने ५५ आणि न्यूझीलंड संघाने ४९ सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com