
मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीनंतर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. आयसीसीद्वारे (ICC) जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडिया कसोटीत अव्वल स्थानी पोहोचले आहे.
टीम इंडियाची ही कामगिरी ऐतिहासिक यासाठी कारण सध्या भारतीय संघ टी-20 आणि वनडेत देखील अव्वल स्थानी आहे. आता कसोटीमुळे भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 ठरला आहे. त्याचबरोबर तिन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये अव्वलस्थान पटकावणारा भारत केवळ दुसरा संघ बनला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अशी कामगिरी केली होती.
रोहित हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 ठरला आहे. सध्या टी-20 संघाचा कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे. वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ 111 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. इंग्लंड 106 गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड 100 गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका 85 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.