IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव

IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव

हेडिंग्ले | Headingley

लॉर्ड्सवर (Lords) झालेल्या पराभवाचा बदला इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत (third test) घेतला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा (India) दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडने या कसोटीत एक डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे....

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) आज लवकर माघारी परतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (Oli Robinson) ६५ धावांत ५ बळी घेत दमदार कामगिरी केली. चेतेश्वर पुजाराच्या शतकाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पण आज खेळ सुरू झाल्यानंतर रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले. पुजाराने ९१ धावांची खेळी केली. रॉबिन्सनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. गोलंदाज क्रेग ओव्हर्टनने केएल राहुलला (KL Rahul) वैयक्तिक आठ धावांवर माघारी परतवले. रोहितने चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. ३८ व्या षटकात रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला आधार दिला.

परंतु ओली रॉबिन्सनने रोहितला माघारी धाडले. रोहितने ५९ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्याने पुजारासोबत धावा जमवल्या. चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजाराला एकदेखील धावेची भर घालता आली नाही. ओली रॉबिन्सनने पुजाराला पायचित पकडले.

त्यानंतर अजिंक्य रहाणे विराटची साथ द्यायला मैदानात उतरला. विराटने लवकरच तंबूचा मार्ग धरला. रॉबिन्सनने त्याला वैयक्तिक ५५ धावांवर बाद केले. अजिंक्य रहाणेदेखील अँडरसनचा बळी ठरला. त्यानंतर ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि इशांत शर्माही चमत्कार दाखवू शकले नाहीत. इशांत शर्मा रॉबिन्सनचा पाचवा बळी ठरला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com