दिल्ली l Delhi

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामान्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना शनिवार, १३ फेब्रुवारी चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यांत आली आहे.

या जाहीर झालेल्या संघातून जोफ्रा आर्चरसह ४ प्रमुख खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. त्यांच्याजागी ४ नव्या खेळाडूंना संघात सहभागी करण्यात आले आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला दुखापतीमुळे बाहेर ठेवण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या हाताच्या कोपऱ्याला वेदना होत होत्या. त्या वेदनेत वाढ झाल्याने त्याला इंजेक्शन घ्यावे लागले आहे. आर्चरच्या जागी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला जागा देण्यात आली आहे. तसेच संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन यालाही दुसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याबरोबरच पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू डोमिनिक बेसलाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्यांच्याजागी ख्रिस वोक्स आणि ओली स्टोन या गोलंदाजांना संघात सहभागी करण्यात आले आहे. सोबतच यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याला डच्चू देत बेन फोक्सची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी फोक्सच्या खांद्यावर असेल. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अली यालाही संघात जागा मिळाली आहे. उर्वरित संघ पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे असेल.

...असा असेल संघ

जो रूट (कर्णधार)

रोरी बर्न्स

डॉम सिबली

डॅन लॉरेन्स

बेन स्टोक्स

ओली पोप

बेन फोक्स (यष्टीरक्षक)

मोईन अली

स्टुअर्ट ब्रॉड

जॅक लीच

क्रिस वोक्स

ओली स्टोन

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवत ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली (७२) वगळता इतर कोणताही खेळाडू चांगली खेळी करू शकला नाही.