दिल्ली । Delhi

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या रोहित शर्माही आपला क्वारंटाइन कालावधी संपवत ३० डिसेंबरला संघात दाखल झाला. पण एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना त्यांनी चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने त्यांना एकांतवासात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या चाहत्याने खेळाडूंच्या जेवणाचे बिल भरले होते, त्यामुळे खेळाडूंनी त्याची भेट घेतली होती. या भेटीचा खुलासा चाहत्याने ट्विटरवर केला होता.

आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या ५ खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. तसेच त्यांना भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघापासून वेगळे करण्यात आले आहे. असे असले तरी त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघातील सर्व सदस्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक नियम केलेल आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच असेही सांगण्यात आले आहे की 'बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच याचाही शोध घेत आहेत की जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला आहे की नाही.' याबरोबरच अशीही माहिती देण्यात आली आहे की 'तात्काळ भारतीय आणि ऑस्ट्रेलियन वैद्यकीय पथकाच्या सल्यानुसार या खेळाडूंना सावधगिरी म्हणून वेगळे ठेवण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमाप्रमाणे खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर पडण्याची परवानगी होती, तसेच ठरवून दिलेल्या मेलबर्नच्या सीमा पार करण्याती मात्र परवानगी नव्हती. त्याप्रमाणे खेळाडूंनी परवानगी असलेल्या ठिकाणी जेवण केले होते. मात्र ते यादरम्यान चाहत्याला भेटले. त्यामुळे कदाचीत जैव -सुरक्षित वातावरणाच्या नियमाचा भंग झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण खेळाडूंना सोशल डिस्टसिंग न पाळता चाहत्यांना भेटण्याची परवानगी नाही.

काय आहे प्रकरण ?

भारतीय संघातील रोहित शर्मा, ऋषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिल हे चार खेळाडू मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्या रेस्टॉरंटमध्ये या खेळाडूंजवळच्या टेबलावर बसलेल्या एका चाहत्याने त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला.

या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचंही या चाहत्याने सांगितलं. मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या पाच जणांना वेगळ्या ठिकाणी विलग करण्यात आले आहे. करोना संदर्भातील नियमावली लक्षात घेता इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून या पाच खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने शनिवारी दिली.