
इंदोर | Indore
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या कोळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसरा सामना देखील तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. पण यावेळी भारतीय संघ पराभूत झाला असून ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. मात्र २-१ने टीम इंडिया अजूनही पुढे आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसले. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांची आवश्यकता होती आणि ती एका गड्याच्या मोबदल्यात पार केली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. धावांचा पाठलाग करताना उस्मान खाव्जाला भोपळाही फोडता आला नाही. शून्य धावांवरच कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर उंदरा-मांजराचा खेळ काही काळ सुरु राहिला. मात्र मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांनी आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली आणि लाबुशेनने विजयी चौकार मारून भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवले. लाबुशेन आणि हेड यांनी अनुक्रमे २८ आणि ४९ धावा करून ते नाबाद राहिले. केवळ अश्विनला १ गडी बाद करता आला.
तत्पूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर अक्षरशः लोटांगण घातले. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून ‘मिस्टर डिपेंडंट’ अशी ओळख असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या. त्याचा स्टीव्ह स्मिथने शानदार झेल घेतला आणि टीम इंडियाची शेवटची आशा देखील मावळली. नॅथन लायनने ८ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकून ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकत अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाचा पराभवामूळे मार्ग कठीण झाला आहे. या स्थितीत भारताला चौथी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. बरोबरी किंवा पराभव झाल्यास न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून रहावे लागेल.