ICC World Cup Records : 49 षटकार अन् 116 चौकार!

ICC World Cup Records : 49 षटकार अन् 116 चौकार!

फलंदाजी करताना वेगवान धावांसाठी सर्वांत मोठा आधार असतो तो षटकार अन् चौकारांचा. खेळपट्टीवर आल्यानंतर चेंडू सीमापार लगावण्याचा प्रत्येक फलंदाजाचा मनसुबा असतोच. आतापर्यंत्च्या विश्वचषकांत चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पडल्याचे आपण पाहिले आहे. सर्वांत जास्त षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या तडाखेबाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2003 ते 2019 या पाच स्पर्धांमध्ये 35 सामने खेळत तब्बल 49 षटकार व 116 चौकार लगावत चेंडू सीमापार केले. त्याच जोरावर त्याने 2 शतके व 6 अर्धशतके ठोकत एकूण 1186 धावा केल्या आहेत. सर्वाधिक षटकारांचा विक्रम सध्यातरी स्फोटक फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या ख्रिस गेलच्याच नावावर आहे.

भारताच्या हीटमॅन अर्थात रोहीत शर्मा यानेही आतापर्यंतच्या तीन विश्वचषक स्पर्धांत चांगलीच फटकेबाजी केली आहे. 23 सामन्यांत त्याने 43 षटकार व 143 चौकार खेचले आहेत. रोहितच्या नावावर 7 शतके व 5 अर्धशतके आहेत. आतापर्यंतच्या विश्वचषक सामन्यांत त्याने एकूण 1376 धावा केल्या आहेत. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्याने अनेकदा धडकी भरवली आहे. षटकारांच्या क्रमवारीत त्याचा दुसरा क्रमांक लागतो. ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला केवळ 6 षटकारांची आवश्यकता आहे. सर्वाधिक षटकारांचा विक्रम लवकरच त्याच्या नावावर दिसेल यात शंकाच नाही.

सर्वाधिक षटकारांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स याचा तिसरा क्रमांक लागतो. 2007 ते 2015 या तीन स्पर्धांत त्याने 23 सामने खेळत 37 षटकार व 121 चौकार मारले आहेत. तंत्रशुद्ध फटके मारण्यात तो पटाईत होता. विश्वचषकांत 4 शतके, 6 अर्धशतके व एकूण 1207 धावा त्याच्या नावावर आहेत.

तब्बल 5 विश्वचषके आपल्या नावावर करणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सर्वच स्पर्धा गाजवल्या आहेत. 2015पासून विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या डेव्हीड वॉर्नरनेही जोरदार चौकार-षटकार ठोकले आहेत. एकूण 24 सामन्यांत त्याने 36 षटकार व 142 चौकार ठाकले आहेत. सहा शतके व 4 अर्धशतकांच्या जोरावर त्याने आतापर्यंत 1378 धावा केल्या आहेत. अनेक सामन्यांत वेगवान फलंदाजी करत त्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणार्‍या पहिल्या पाचजणांच्या जागतिक क्रमवारीत सर्वांत शेवटी ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. सध्याची ही त्याची तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. 24 सामने खेळत त्याने प्रतिस्पर्धा गोलंदाजांना 33 षटकार व 73 चौकार लगावले आहेत. या फटकेबाजीचा आधार घेत त्याने विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन शतके व अर्धशतके केली आहेत. संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. उत्तुंग षटकार ठोकण्यात तो तरबेज आहे.

षटकारांचा विक्रम सध्यातरी ख्रिस गेलच्या नावावर आहे. मात्र अग्रक्रमवारीतील पाचजणांपैकी तीन फलंदाज सध्याच्या स्पर्धेत खेळत आहेत. भारताचा रोहीत शर्मा व ऑस्ट्रेलियाचे डेव्हीड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल या तिघांनीही तीन स्पर्धांत जवळपास सारखेच सामने खेळले आहेत. तडाखेबंद फलंदाजी करत ते लवकरच अनेक नवनवे विक्रम करतील, असे क्रिकेट रसिकांना वाटते. षटकार-चौकार मारून वेगवान धावसंख्या उभारण्यात त्यांना नेहमीच मोठा वाटा राहिला आहे.

- संदीप जाधव

(9225320946)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com