ICC World Cup Records : 1999..पाकचा सर्वात लाजीरवाणा पराभव!

भेदक अन् फिरकी गोलंदाजांमुळे कांगारू दुसर्‍यांदा विश्वविजयी
ICC World Cup Records : 1999..पाकचा सर्वात लाजीरवाणा पराभव!

सन 1999मध्ये तब्बल 16 वर्षांनंतर इंग्लंडला विश्वचषकाचे आयोजन करण्याचा मान पुन्हा मिळाला. या विश्वचषकात भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश श्रीलंका, झिम्बाब्वे, केनिया, स्कॉटलंड हे 12 संघांचा समावेश होता. 14 मे ते 20 जून या दरम्यान ही स्पर्धा झाली. उपांत्यफेरीतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना कमालीचा रोमहर्षक झाला. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघही 213 धावावरच बाद झाला. सामना बरोबरीत सुटला. मात्र, सुपर सिक्समधील वरच्या स्थानामुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसरीकडे वसीम अक्रमच्या पाकिस्तान संघाने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवित अंतिम फेरीकडे कूच केले.

20 जून 1999 रोजी अंतिम सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सचे मैदान खचाखच भरले होते. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानच्या सईद अन्वर व वजाहतुल्ला वस्ती यांनी धावा करण्यास सुरुवात केली. पाचव्याच षटकात मॅकग्राथने वस्तीला (1 धाव) बाद केले आणि पाकिस्तानला 21 धावांवर पहिला धक्का बसला. त्या पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सईद अन्वरचा (15 धावा) त्रिफळा फ्लेमिंगने उडवला अन् पाक समर्थक प्रेक्षकांत सन्नाटा पसरला. त्यानंतर अब्दुल रज्जाक व इजाज अहमद धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र अडखळत खेळतानाच विसाव्या षटकात 68 धावा असताना अब्दुल रज्जाकला (17 धावा) मुडीने झेलबाद केले. इजाज अहमद (22 धावा) शेन वॉर्नच्या फिरकीवर त्रिफळाबाद झाला.

त्यानंतर पाकिस्तानची घसरगुंडी उडाली अन् त्यांचा खेळ 39 षटकांत 132 धावांवर संपला. बळी शेन वॉर्नने 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियासमोर 133 धावांचे किरकोळ लक्ष्य होते. मार्क वॉ (37 धावा) व अ‍ॅडम गिलख्रिस्ट (54 धावा) यांनी सलामीला येऊन धडाकेबाज सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या रिकी पाँटिंग (24) व डॅरेन लेहमन (13 धावा) यांनीही चांगला खेळ केला. ऑस्ट्रेलियाने केवळ 20 षटकांत विजय मिळवून विश्वचषकावर दुसर्‍यांचा आपली मोहेर उमटवली. शेन वॉर्नला सामनावीर घोषित करण्यात आले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील पाकिस्तानचा हा सर्वांत लाजिरवाणा पराभव होता.

- संदीप जाधव

9225320946

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com