ICC World Cup : चक्क...पाकिस्तानचा भारताला पाठिंबा

ICC World Cup : चक्क...पाकिस्तानचा भारताला पाठिंबा

भारत-पाकिस्तानचे वैर जगजाहीर आहे. मैदानातील युद्धात ते नेहमी दिसते तसे ते क्रिकेट व हॉकीच्या मैदानातही दिसते. भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या बकर्‍याही वाघ होतात, अशी दर्पोक्ती पाकिस्तानी खेळाडू कधीकाळी करीत असत. पण यंदाच्या विश्वकप स्पर्धेने आगळीवेगळी किमया साधली असून, चक्क पाकिस्तानच्या नागरिकांनी भारताला विजयासाठी पाठिंबा दिला. पाकिस्तानचा संघ विश्वकप स्पर्धेतून बाहेर फेकला जाण्याच्या स्थितीत आहे. अशा वेळी भारताने सर्व सामने जिंकले तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हेतूने पाकिस्तानचा भारतीय संघाला मिळालेला पाठिंबा मात्र चर्चेत आहे.

भारतीय संघ उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे. वानखेडेच्या मैदानात टीम इंडियाने विजय मिळवल्याने सेमीफायनलचे तिकिट फायनल झाले आहे. भारताच्या या विजयासाठी पाकिस्तान क्रिकेट चाहतेही आतुर दिसले. ते भारतीय संघाला सपोर्ट करताना दिसले. सोशल मीडियावरही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी ट्वीट केले. पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला राहिलेल्या आपल्या सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे भारताच्या विजयासाठी पाकिस्तानच्या चाहत्यांचा सपोर्ट दिसल्याचे सांगितले जाते.

वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेचा पराभव केल्याने पाकिस्तानचे सेमीफायनलचे आव्हान जिवंत राहिले आहे. भारताविरोधात पराभव झाल्याने श्रीलंकेचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताने विजय मिळवल्याने सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. याचा पाकिस्तानला फायदा होणार आहे. पाकिस्तान संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचे सात सामन्यात चार पराभव झाले आहेत. पण, तीन विजयासह त्यांचे सहा गुण आहेत. श्रीलंका संघाने भारताविरुद्धचा सामना जिंकला असता तर ते पाकिस्तानच्या बरोबरीने पोहोचले असते, त्यामुळे त्यांनाही सेमीफायनलची संधी मिळाली असती. व त्यामुळे पाकिस्तानला अफगाणिस्तानसह श्रीलंकेसोबतही सेमीफायनलसाठी संघर्ष करावा लागला असता.

पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता कमी आहे, पण आशा अद्याप शिल्लक आहेत. त्याशिवाय इतर संघाच्या जय-पराभवावर अवलंबून राहावे लागेल. भारतीय संघाने लंकेवर मिळवलेला विजय व दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा केलेला पराभव केला, यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा उंचावल्या. न्यूझीलंड 8 गुणांसह आता चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे दहा गुण होतील. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरोधात आहेत. न्यूझीलंडला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी विजय अनिवार्य आहे. त्या सामन्यात पाकिस्तान व न्यूझीलंड या दोन्ही संघांचा कस लागणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com