ICC World Cup
ICC World Cup

ICC World Cup : प्रेक्षक हो...येताय ना

एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता टी-20 मुळे कमी झाली आहे. ट्वेटीं-ट्वेंटी सामन्यात पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी पाहायला मिळते. 120-120 चेंडूंच्या या लढतीत प्रतिषटक 8 धावा काढल्या तरी त्या कमी पडतात. अशा स्थितीत वर्ल्डकपचे 50-50 षटकांचे सामने तसे नीरस वाटत असल्याने वर्ल्डकपला अजूनही प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद नाही. विश्वचषक असल्याने भारताच्या सर्व सामन्यांना गर्दी होत आहे, पण बाकी सामन्यांना मैदाने पूर्ण भरत नाहीत. पन्नास षटकांच्या क्रिकेटमध्ये दुसरा पॉवर प्ले अजून इंटरेस्टिंग कसा करता येईल, हे पाहण्याची गरज आहे. तरच 50-50 षटकांचे क्रिकेट टिकेल असे वाटते.

विश्वचषक असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, प्रेक्षकांना आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक स्पर्धेत थरार हवा आहे. पन्नास षटकांच्या सामन्यातील थरार शेवटीच दिसतो. पहिल्या व शेवटच्या 10 षटकांमध्ये फटकेबाजी व चौकार-षटकार आतषबाजी दिसते. अभावानेच काही संघर्षमय क्षण दिसतात. पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया या दोन सामन्यात अंतिम क्षणी थरार दिसला. दक्षिण आफ्रिकेने पराभवाचे रुपांतर एक गडी राखून मिळवलेल्या विजयात केले तर न्यूझीलंडला विजयाच्या समीप जाऊनही दुर्दैवाने पाच धावांनी मात खावी लागली. पण, असे क्षण अभावाने असल्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद भारत नसलेल्या सामन्यांना कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता स्पर्धा पाहायला येता का, असे विचारण्याची वेळ आली आहे.

या विश्वचषकापुरते बोलायचे, तर प्रेक्षकांचा उपांत्य फेरीपर्यंत उत्साह टिकवून ठेवायचा असेल, तर राहिलेल्या सामन्यात संघर्ष, खळबळजनक घटना वा काहीतरी थरार गरजेचा आहे. यासाठी सर्वजण आता उपांत्य फेरीचीच वाट बघत आहेत. ट्वेंटी-ट्वेंटीचा जमाना असला तरी वन डे मॅचमध्ये एकाचवेळी फलंदाजी व गोलंदाजीचे कसब दिसते. फलंदाजांची फटकेबाजीही दिसते व त्याचवेळी डाव सावरण्याची खेळी करताना क्रिकेटची नजाकतही दिसते. त्यामुळे क्रिकेट शौकिनांना यात सारे काही मिळते. पण 50-50 षटके थांबणे म्हणजे आख्खा दिवस घालवणे असते. त्यापेक्षा चार तासात आटोपणारे ट्वेंटी-ट्वेंटी सामने बरे म्हणत प्रेक्षक आयपीएल डोक्यावर घेतात. त्यामुळे वन डेचे कमी होणारे प्रेक्षक हे खेळाडूंसह स्पर्धा आयोजकांसमोरही आव्हान आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com